जय भीम : बाबासाहेबांच्या विचाराप्रती सन्मानाचे प्रतीक…खासदार बाळू धानोरकर यांचे प्रतिपादन…

221

चंद्रपूर : जय भीम हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराप्रती सन्मानाचे प्रतीक आहे. या शब्दामध्ये प्रत्येकाचा स्वाभीमान आहे. या शब्दात प्रचंड ऊर्जा आहे. त्यामुळे कोट्यवधी भारतीय भेटीत जय-भीम शब्द सुमनातून अभिवादन करीत असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

 

लोकजागृती संस्था, जयभीम संमेलन समिती चंद्रपूरच्या वतीने येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित प्रथम राष्ट्रीय जयभीम संमेलनात ते बोलत होते.

 

यावेळी संमेलनाध्यक्ष रावसाहेब कसबे, आमदार किशोर जोरगेवार, काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंभोरे, स्वागताध्यक्ष अनिरुद्ध वनकर, प्रा. इसादास भडके, अश्विनी खोब्रागडे आदी उपस्थित होते.

खासदार धानोरकर पुढे म्हणाले, देशाच्या सध्याच्या परिस्थितीवर फोकस टाकण्याच्या उद्देशातून जय भीम संमेलनाचे आयोजन निश्चितच कौतुकास्पद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विपूल लेखन केले आहे. त्यांची ग्रंथसंपदा, विचार हे सर्व पिढीसाठी प्रेरणादायी असे आहे. डॉ. बाबासाहेब हे प्रचंड प्रतिभाशाली व्यक्तिमत्व होते. मराठी, संस्कृत, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड, पारसी अशा अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. लेखन प्रपंचातून या महामानवाने समाज सुधारणेवर भर दिला. जाती, धर्मातील भेदाभेद विसरुन एक भारतीय माणूस म्हणून काम केल्यास देशाची विकासाकडे वाटचाल होईल, या समर्पीत भावनेने त्यांनी कार्य केले आहे. बाबासाहेबांचे विचार संपूर्ण विश्वात रुजावेत म्हणून अशा संमेलनाची आवश्यकता आहे. सध्या देशातील सत्ताधाऱ्यांकडून काही विशिष्ट समूहाला सोबत घेऊन काम केले जात आहे. त्यामुळे देशाचा कारभार हा हिटलरशाहीच्या दिशेने सुरू आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातो. शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे, हा प्रकार चुकीचा आहे. आयोजक अनिरुद्ध वनकर यांना आमदारकी मिळणार होती. परंतु, काळी टोपीवाल्यांमुळे ती मिळू शकली नाही, असे सांगत नाव न घेता माजी राज्यपालाच्या कारभारावर टीका केली.