पाणी समस्या सोडवा, अन्यथा घागर मोर्चा काढू महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे यांचा इशारा मनपा आयुक्तांना दिले बाबुपेठ प्रभागातील पाणी समस्येचे निवेदन

358

चंद्रपूर : शहरातील बाबुपेठ प्रभागात मागील काही दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. महापालिका प्रशासनाने ही समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चंदाताई वैरागडे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन मनपा आयुक्ता विपीन पालिवाल यांना सादर करण्यात आले आहे.

मागील पाच दिवसांपासून बाबुपेठ प्रभागातील नेताजी चौक, गुरूदेव चौक, ढिवर मोहल्ला, सोनजारी मोहल्ला, हुडको क्वार्टर, बालाजी मंदिर, मराठा चौक, जुनोना चौक व इतर ठिकानी भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर, दुसरीकडे बाबुपेठ येथे सुरू असलेल्या नाली बांधकामामुळे ठिकठिकाणी पाईप लाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. मात्र, याकडे कुणाचेही लक्ष नाही.
बाबुपेठ प्रभागातील पिण्याच्या पाण्याची समस्या मागील अनेक वर्षांपासून कायम आहे. ही समस्या सुटावी यासाठी कॉंग्रेसतर्फे अनेकदा निवेदने देण्यात आली. आंदोलनेसुद्धा करण्यात आली. परंतु, प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना करण्यात आली नसल्याने पाणी समस्या जैसे थे आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये मनपा प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मनपा प्रशासनाने येथील भीषण पाणीटंचाईची तत्काळ दखल घेत नियमित पाणीपुरवठा करावा, अन्यथा चंद्रपूर शहर महिला कॉंग्रेसच्या नेतृत्वात लवकरच महानगरपालिकेवर भव्य घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी,नम्रता मोरे,प्रेमीला वाटकर,रोशनी राजूरकर,लीला बुटले, सरोज रॉय,कविता बावणे,उज्वला कारलेवार, संतोषी कन्नूर, तृप्ती राजूरकर,अंजु वैरागडे,अपर्णा धकाते, स्नेहल अंबागडे,आम्रपाली खोब्रागडे,संगीता देठे आदी बाबूपेठ परिसरातील महिला उपस्थित होत्या.