डोंगरहळदी तुकूम शाळेची गुणवत्ता वाखाण्याजोगी धनंजय चापले,ज्येष्ठ अधिव्याख्याता डायट चमुने विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही केले कौतुक

377

पोंभूर्णा: विद्यार्थ्यांचे मराठी, इंग्रजी विषयाचे प्रत्यक्ष वाचन,त्यांचे हस्ताक्षर,आणि अन्य उपक्रम पाहिल्यानंतर डोंगरहळदी तुकूम शाळेची शैक्षणिक प्रगती वाखाणण्याजोगी असल्याची प्रतिक्रिया जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे ज्येष्ठ अधिव्याख्याता धनंजय चापले यांनी व्यक्त केली.यावेळी पुढे त्यांनी शाळापुर्व तयारी मेळावा आयोजित करण्याबाबत सूचनाही दिल्या. पोंभूर्णा पंचायत समितीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरहळदी तुकूम येथे आज जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या चमुने भेट दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे येथील अधिव्याख्याता ज्योती राजपूत, अधिव्याख्याता विनोद लवांडे, विषय सहाय्यक रवी तामगाडगे, अमोल बल्लावार आदिंची उपस्थिती होती. यावेळी मुख्याध्यापक जे. डी. पोटे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी प्रा. ज्योती राजपूत यांनी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर वाचन केलेल्या पुस्तकातील गोष्टी सांगायला लावल्या.तर प्रा. विनोद लवांडे यांनी दाखल पात्र विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्व विद्यार्थ्यांना बोलते केले. तसेच त्यांनी शाळेत सुरू असलेल्या ‘मी ज्ञानी होणार ‘या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले असता विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी दिल्याचे आणि तीन शब्दावरून गोष्ट तयार करायला सांगितली असता अगदी काही क्षणात गोष्ट तयार केल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.यावेळी शालेय परिसराची स्वच्छता, काही विद्यार्थ्यांचे इंग्रजी आणि मराठी विषयातील हस्ताक्षर,दिलेल्या तीन शब्दावरून गोष्ट सांगणे, विद्यार्थ्यांचे वाचन, सामान्यज्ञान,गणितीय क्रिया पाहून निपून भारत अभियानाचे निकष शाळा पूर्ण तयार करीत असल्याचे डायटच्या चमुने सांगितले व विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले. शेवटी सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापक जे. डी. पोटे यांनी आभार मानले.