अमृत योजनेविना चंद्रपूरकरांच्या घशाला कोरड नेक ठिकाणी कामे अपूर्ण, आत्मदहनाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे देवतळे यांचा इशारा

648

चंद्रपूर ः चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून अमृत योजनेला काही वर्षांपूर्वी सुरुवात झाली. अमृत योजनेमुळे चंद्रपूरकरांची पाण्याची समस्या सुटेल, अशी आशा होती. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून अमृत योजनेच्या कामाची गती मंदावली आहे. अनेक ठिकाणी कामे अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांच्या घशाला कोरड पडली आहे. अमृत योजनेची कामे तातडीने पूर्ण न केल्यास आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी दिला आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून चंद्रपूर शहरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी अमृत योजना सुरू करण्यात आली. कोट्यवधी रुपये अमृत योजनेवर खर्च करण्यात आले. योजनेसाठी शहरातील अनेक रस्ते फोडण्यात आले. त्यातून पाईपलाईन टाकण्यात आली. आज पाच वर्षांचा काळ लोटला तरी अमृत योजनेचे काम पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळे आजही चंद्रपूरकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. चंद्रपूर शहरातील अनेक भागांत सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अमृत योजनेचे काम करण्याच्या मागणीसाठी राहुल देवतळे यांनी २१ डिसेंबर २०२२ रोजी महानगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले होते. उपोषणादरम्यान मनपाने लेखी कळवून लवकरात लवकर योजनेचे काम पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेऊन देवतळे यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र, आज कित्येक महिने लोटले तरी काम पूर्ण झाले नाही. सध्या विठ्ठल मंदिर प्रभागातील अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अमृत योजनेचे पाईप लाईन व विठ्ठल मंदिर प्रभागातील घरगुती नळाला पाणी पुरवठा पूर्ण न झाल्यास आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा देवतळे यांनी दिला आहे.