तालुक्याला मिळाले एक मंडळ व सहा नवीन तलाठी साजे तलाठी साजांची संख्या झाली १८ : नागरिकांची पायपीट थांबणार बळीराम काळे, जिवती

487

जिवती (ता. प्र.) : अतिदुर्गम व आदिवासी बहुल जिवती तालुक्यात जिवती व पाटण दोन मंडळ व १२ तलाठी साजा अस्तित्वात होते. जिल्ह्यातील तलाठी साजाची पुनर्रचनेनुसार १३३ तलाठी आणि २३ मंडळ अधिकारी भरतीवर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यामुळे तालुक्यातही आणखी ०६ नवीन तलाठी साज्याची निर्मिती करण्यात आली तर एक मंडळ कार्यालय मंजुर करण्यात आले. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांना एका साजातील सात ते आठ गावाचा कारभार करताना होणाऱ्या दमछाक पासून दिलासा मिळाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, नवीन तलाठी साजा पुनर्रचनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू होती. तलाठी साजाच्या पुनर्रचनेनुसार जिल्ह्यात नव्याने १३३ तलाठी साजाची निर्मिती करण्यात आली.एकूण ८३ गावांचा समावेश असलेल्या जिवती तालुक्यात ०६ नवीन तलाठी साजे निर्माण झाले असून आता एकूण तलाठी साजाची संख्या १८ झाली आहे. तर एक नवीन मंडळाचीही निर्मिती झाल्याने एकूण तीन मंडळे झाली आहेत.
तालुक्यात १२ तलाठी साजाचा कारभार १० तलाठी पाहत आहेत. वणी (बूज) व टेकामांडवा येथील दीड ते दीन वर्षापासून तलाठी पद रिक्त आहेत. अतिरिक्त कामामुळे व एका साजात सात ते आठ गावांचा समावेश असल्याने तलाठ्यांना कामाचा ताण वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांशी संबंधित कामाचा खोळंबा होत असून अनेक प्रकरणे तुंबून आहेत.
राज्य शासनाने पदभरतीला मान्यता दिली असून तलाठी भरतीसाठी दिनांक २६ जून ते १७ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. यामुळे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यावरील कामाचा ताण नक्कीच कमी होणार व शेतकऱ्यांचीही कामे होतील असे चर्चिल्या जात आहे.

– जिवती व पाटण या दोन मंडळाअंतर्गत जिवती, येल्लापुर, वणी (बुज), नोकेवाडा, नगराळा, पाटण, नंदप्पा, पुनागुडा, शेणगाव, टेकामांडवा, कुंभेझरी, भारी अशी १२ तलाठी साजे अस्तित्वात होती.

– साजा पुनर्रचनेनुसार तालुक्यात आता कोदेपुर, दमपुर मोहदा, धनकदेवी, खडकी हिरापुर, आंबेझरी, चिखली (खुर्द) अशी सहा नवीन तलाठी साजे होणार असून १) कोदेपुर साजात – कोदेपुर, नारपठार, घारपाणा, करणकोंडी, मरकलमेटा, २) दमपुर मोहदा साजात – दमपुर मोहदा, लभानगुडा, केकेझरी, ३) धनकदेवी साजात – धनकदेवी, जांबुळधरा, मरकागोंदी, कारगाव (खुर्द) ४) खडकी हिरापुर साजात – खडकी हिरापुर, टाटाकोहोड, डोंगरगाव, गोविंदपुर ५) आंबेझरी साजात – आंबेझरी, पिट्टिगुडा १, मरकागोंदी, पल्लेझरी व ६) चिखली (खुर्द) साजात – चिखली (खुर्द), पालडोह, पाटागुडा, लेंडीगुडा या गावांचा समावेश असणार आहे.