Election Commission : देशातील 7 विधानसभा पोटनिवडणुकींची घोषणा… मात्र महाराष्ट्रातील लोकसभा पोटनिवडणुकीचा उल्लेखच नाही

377

नवी दिल्ली : एकीकडे संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात या ना त्या कारणाने सत्ताधारी-विरोधक आमने-सामने येत असताना अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 7 विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे.

पुढील महिन्यांत 5 सप्टेंबरला या निवडणुका होऊ घातलेल्या असतानाच मात्र महाराष्ट्रातील दोन लोकसभा मतदार संघाचा त्यामध्ये उल्लेख नसल्याने राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाने ट्वीस्ट आणला आहे.

देशभरातील सात विधानसभेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही घोषणा केली असून येत्या 5 सप्टेंबरला या सात विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडणार आहे. यामध्ये झारखंड, त्रिपुरा, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील मतदारसंघाचा समावेश आहे.

चर्चा खरी ठरण्याची शक्यता
महाराष्ट्रातील पुणे येथील भाजपचे नेते गिरीश बापट यांच्या निधनाने पुण्याची जागा रिक्त झाली होती. तर बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त आहे.
दरम्यान एका वर्षावर आलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमुळे या ठिकाणी पोटनिवडणुका होणार नसल्याची चर्चा रंगत होती. दरम्यान आज केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातील सात विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करताना राज्यातील या दोन्ही लोकसभा मतदार संघाचा पोटनिवडणुकीसाठी उल्लेख न केल्यानी ही चर्चा खरी ठरते की काय ? अशी चर्चा सध्या रंगत आहे.

गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांना आता 2024 ची प्रतीक्षा
पुणे आणि चंद्रपूरमधील लोकसभेच्या पोटनिवडणुका होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने या ठिकाणी थेट 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरी देशभरातील सात ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या, मग पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक का नाही?, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.तर ज्यांनी या ठिकाणी निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी केली असेल त्यांना पुढील 2024 ची वाट पहावी लागणार आहे एवढे मात्र खरे.