गडचिरोली : परस्पर कोंबडा कापून खाल्ल्याने पोटच्या मुलाची कुऱ्हाडीने वार करून हत्या करणाऱ्या निर्दयी पित्याला जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली.अहेरी तालुक्यातील येंकाबंडा येथे साडेतीन वर्षांपूर्वी हा थरार घडला होता. १० ऑगस्ट रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्या. उदय शुक्ल यांनी हे आदेश दिले.
शंकर रामा कोडापे (३०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून रामा गंगा कोडापे (५५) असे आरोपीचे नाव आहे. ४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पती शंकर खाटेवर झोपले होते तर सासरा रामा हा बाहेरून घरी आला. यावेळी माझा कोंबडा तू का कापला? असा जाब विचारत रामाने वाद घातला. त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. रामाने त्याला खाटेवरून खाली ढकलून दिले.
त्यानंतर घरातून जुनी लोखंडी कुन्हाड आणून थेट हल्ला चढवला. निर्दयीपणे उजव्या व डाव्या हातावर, पोटावर, हाताच्या कोपऱ्यावर, मांडीच्या मागच्या बाजुला दोन्ही पायावर सपासप वार केले. पत्नी मदतीसाठी सरसावली असता तिला धमकी देउन रामाने तेथून पळ काढला.
यावेळी रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या पतीला राधाने उठवण्याचा प्रयत्न केला असता, ताे निपचित पडलेला हाेता. त्यानंतर तिने आरडाओरड केली. याप्रकरणी जिमलगट्टा पाेलिस ठाण्यात रामा काेडापे याच्या विरूध्द खुनाची फिर्याद दिली.
तत्कालीन उपनिरिक्षक राहूल फड यांनी तपासणी करून आराेपीला जेरबंद केले. त्यानंतर दाेषाराेपपत्र न्यायालयास सादर केले. या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात उदय शुक्ल यांच्यासमाेर झाली. त्यांनी साक्षिपुरावे तपासून आराेपीला दाेषी ठरवले.
त्यानंतर १० ऑगस्टला त्यास जन्मठेप व १० हजार रुपये दंड व सहा महिने शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील एस. यू. कुंभारे यांनी काम पाहिले. या प्रकरणाच्या सुनावणीकडे अहेरी परिसरातील लाेकांचे लक्ष लागले.
सुनेच्या जबाबावरून सासऱ्याला शिक्षा
या प्रकरणामध्ये राधा काेडापे ही एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हाेती. न्यायालयात तिने सर्व घटनाक्रम सांगितला. यावेळी तिला अश्रू अनावरण झाले हाेते. तिचा जबाब आराेपीला शिक्षेपर्यंत पाेहचविण्यासाठी महत्वाचा ठरला.