गडचिरोली : आदिवासी विकास विभाग अंतर्गत आयुक्त स्तरावरून राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकांची क्षमता परीक्षा राज्यभरात रविवार १७ सप्टेंबर रोजी दुपारी २.०० ते ३.३० वाजता आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेवर जवळपास शंभर टक्के शिक्षकांनी एकजुटीने बहिष्कार घातल्याने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील परीक्षा केंद्रावर प्रशासनाची तारांबळ उडाली. आणलेला प्रश्नपत्रिकेचे गट्टे परत घेऊन जाण्याची नामुष्की परीक्षा व्यवस्थापन अधिकाऱ्यांवर आली.
आदिवासी विकास विभागाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली. यापुढे शिक्षकांची मानहानी करण्याचे आदिवासी विकास विभागाने थांबवावे, असे आवाहन सीटू संलग्नित आदिवासी विकास शिक्षक व कर्मचारी संघटनेने केले आहे.
परीक्षा केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व परीक्षा व्यवस्थापन अधिकाऱ्यांना शेवटी हताश व्हावे लागले. आदिवासी विकास विभाग आयुक्तालय अंतर्गत नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर हे चार विभाग आहेत. याअंतर्गत राज्यात ५९६ शासकीय तर ५५६ अनुदानित अशा एकूण १ हजार १५२ शाळा आहेत. क्षमता परीक्षेवर १० हजारावर शिक्षकांनी बहिष्कार घातला. शिकवत नसलेल्या विषयाची एकत्रित प्रश्नपत्रिका परीक्षा घेऊन या शाळेतील शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण व बदनामी करण्याचा हा प्रकार असल्याच्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी या परीक्षेला विरोध केला.
वेळोवेळी शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये त्या विषयाची परीक्षा होत असताना वेगळी परीक्षा घेण्याची गरज का? असा प्रश्न शिक्षकांनी केला. या क्षमता परीक्षेवर बहिष्कार घालण्याचे आवाहन संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी केले होते. संघटनेचे राज्य पदाधिकारी, सर्व विभागीय अध्यक्ष, प्रकल्प अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी आपली शक्ती एकटावून आश्रमशाळेतील सर्व शिक्षकांना बहिष्कार घालण्यास प्रोत्साहित केले. बहिष्कार आंदोलनास सीटू संघटना, आदिवासी विकास विभाग मुख्याध्यापक संघ, विभागीय अनुदानित आश्रम शाळा कर्मचारी संस्कृती संघटना आदी संघटनेने पाठिंबा दिला होता.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे आश्रम शाळेतील शिक्षक भविष्यवेधी शिक्षण व इतर उपक्रमांमध्ये मनापासून प्रयत्न करीत आहेत. अनेक गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांनी घडविले आहे. तरीही इतर विभागातील शिक्षक वगळून उलट दुर्गम, अतिदुर्गम आदिवासी बहुल भागात प्रामाणिकपणे काम करणाऱ्याच आदिवासी विकास विभागाच्या शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या परीक्षेबाबत संतापजनक भावना राज्यातील शिक्षकांमध्ये व्यक्त झाल्या.
क्षमता परीक्षा घेण्यापेक्षा आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीमध्ये अडसर तसेच विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडवणाऱ्या अन्यायकारक वेळापत्रकाला बदलवून पूर्वीप्रमाणेच आश्रम शाळा सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत करावे, अशी मागणी परीक्षेवर बहिष्कार घालणाऱ्या शिक्षकांनी केली आहे. या मागणीला विद्यार्थी व पालकांचाही पाठिंबा आहे.
नागपूर विभागात जवळपास शंभर टक्के बहिष्कार – नागपूर विभागात क्षमता परीक्षेस नऊ प्रकल्प निहाय उपस्थित झालेल्या शिक्षकांची संख्या नगन्य आहे. गडचिरोली ००, अहेरी १० (तासिका शिक्षक), भामरागड ०२ (तासिका शिक्षक), चंद्रपूर ००, चिमूर ०६ (अनुदानित शिक्षक), नागपूर ०२ (अनुदानित शिक्षक), वर्धा ००, देवरी ०१ (शासकीय), भंडारा ०० असे एकूण फक्त २१ शिक्षकच परीक्षेला प्रशासनाच्या भीतीपोटी उपस्थित झाले.