राजुरा : राजुरा येथील सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येत असलेल्या तांदुळामध्ये प्लास्टिक तांदूळ मिक्स असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा तांदूळ धुण्यासाठी पाण्यात टाकला असता प्लास्टिकचा तांदूळ वर येत आहे. हा तांदूळ जनतेच्या जीवाशी खेळणारा असल्याने जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. सध्या तालुक्यातील सप्टेंबर महिन्याचे धान्य वाटप करण्यात येत आहेत. याच वाटपाचा नियमित तांदळामध्ये प्लास्टिक तांदूळ असल्याची ओरड सुरू आहे. अनेक ठिकाणी बहुतेक लाभार्थ्यांना नियमित तांदळामध्ये प्लास्टिकच्या तांदूळ आला आहे हा तांदूळ शुभ्र पांढरा व हलका असल्याने पाण्यात टाकल्यानंतर वर येतो. नियमित तांदळामध्ये प्लास्टिक तांदूळ आढळून आल्याने वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. वंचीत बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आर्वी गावात जाऊन प्रत्यक्ष तांदळाची चौकशी केली असता यात फरक जाणवला. यासंदर्भात तालुक्यातील अन्नपुरवठा अधिकारी यांना वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ.सोमाजी गोंडाणे यांच्या नेतृत्वात वंचितच्या शिष्टमंडळाने भेट घेतली या संदर्भात अन्नपुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांनी आम्ही यावर ठोस पाऊले उचलू असे वंचीतच्या पदाधिकाऱ्याला आश्वासन दिले. यावेळी राजुरा तालुका अध्यक्ष मारुती जूलमे, युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर, जिल्हा सचिव छोटू दहेकर, कोरपना तालुका अध्यक्ष मधुकर चूनारकर, जिवती तालुकाध्यक्ष बालाजी सोनकांबळे, बंडू वनकर, नानाजी जावडेकर इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.