राजुरा : राजुरा शहरालगत रामपूर जंगलात एका युवकाची अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी ४ वाजता उघडकीस आली. संदीप देवराव निमकर (२८, रा.रामपूर, राजुरा) असे मृताचे नाव आहे. सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून हा युवक बेपत्ता होता, अशी माहिती पुढे आले आहे.
रामपूर येथे संदीप निमकर हा आपल्या आई-वडिलांसह राहत होता. सोमवारी रात्री ८ वाजता घराबाहेर गेला. मात्र, परत आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध केली. पण कुठेही पत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार राजुरा पोलिस ठाण्यात दिली. कुटुंबाने संदीपचा शोध सुरू ठेवत असतानाच तो मित्रांसोबत जंगलात जात असल्याची माहिती मिळाली.
नागरिकांच्या सहकार्याने नातेवाईक रामपूरलगत जंगलातील माथरा मार्गावर शोध घेत असताना एका झुडपात संदीपचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह पडलेला दिसून आला. घटनेची माहिती राजुरा पोलिस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश साखरे, ठाणेदार योगेश पारधी यांनी पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.
नागरिकांत शंका-कुशंका
राजुरा शहरालगत रामपूर वस्तीत मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली. यापूर्वी राजुरा शहरातील नाका नं. ३ येथे झालेल्या खुनात रामपूर वस्तीत राहणारे आरोपी निघाले होते. या परिसरात डिझेल, कोळसा व भंगार चोरीच्या घटना घडत असतात. सोबतच जुगार व सट्टा चालतो. यामध्ये बरेच युवक गुरफटले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून शंका-कुशंका व्यक्त होत आहेत.