जिवती (ता.प्र.) : वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष, बालाजी सोनकांबळे यांच्या नेतृत्वात जिवती तालुक्यातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना पट्टे मिळावे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुक्यातील अतिक्रमनधारक शेतकऱ्यांचे भरलेल्या अर्जांचा गठ्ठा जिवतीचे तहसीलदार, शेंबटवाड यांना देण्यात आला.
राज्यातील गायरान जमिनीतील अतिक्रमणधारकांना सरकारने नोटीस बजावल्या. त्यामुळे भटके विमुक्त तसेच अनेक गोरगरीब नागरिकांना बेघर होण्याची भीती निर्माण झाली. या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मुंबई येथे प्रचंड मोर्चा २० जुलै २०२३ रोजी मुंबई येथे काढण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील गायरान जमिनींवर झालेले एकही अतिक्रमण हटविले जाणार नाही, असे ठोस आश्वासन दिले व गायरान जमिनीच्या सातबाऱ्यावर ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांची नावे लावण्याची प्रक्रिया तहसीलदारांमार्फत राबवण्यात येणार असल्याचेही फडणवीस म्हणाले होते. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष, बालाजी सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिवती तालुक्यातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या भरलेल्या अर्जांचा गठ्ठा तहसीलदार शेंबटवाड यांना देण्यात आला.
यावेळी चंद्रपूर जिल्हा पश्चिम विभागाचे अध्यक्ष प्रा.डॉ. सोमाजी गोंडाने, कोरपना तालुक्याचे सल्लागार, मधुकरजी चुनारकर, जिवतीचे तालुका, बालाजी सोनकांबळे, येल्लापुरचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, किर्लोस गायकवाड, वंचित बहुजन युवक आघाडीचे अध्यक्ष, प्रदिप काळे, शुद्धोधन चंदनखेडे, संजय राठोड, सुशील सोनकांबळे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.