अरुण घोरपडे यांचा ” चांगभलं ” कवितासंग्रह म्हणजे जीवनाच्या परिपाकाचा अभंग…

250

आजच्या साहित्याच्या गर्दीतील आमचे वर्दीतील दर्दी साहित्यिक मित्र श्री अरुण घोरपडे यांनी बहात्तर दालनांतून मोकळ्या केलेल्या कवितांचा “चांगभलं” कवितासंग्रह मला सस्नेह सप्रेम भेट दिल्याबद्दल सर्वप्रथम मनःपूर्वक आभार…!!

शब्दांच्या पुढेच अर्थपूर्ण आशयांनी धाव घ्यावी, एवढ्या सरळ सोप्या अभंगांची अनुभूती श्री अरुण घोरपडे यांचा ” चांगभलं ” कवितासंग्रह वाचताना आली.प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर, पंढरपूर यांची ओघवती प्रस्तावना आणि मराठी साहित्याच्या क्षेत्रातील प्रसिद्ध समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे सर यांनी केलेली पाठराखण यामुळे “चांगभलं” कवितासंग्रहाचे मोल वाढलेले आहे.

सर्वसाधारण जीवनाची वाटचाल करताना जे जे उत्तम आणि उदात्त आहे ते ते आपल्याही वाट्याला यावं यासाठी कवींनी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टींचा केलेला स्वीकार म्हणजेच ” चांगभलं “.श्री प्रमोदकुमार अणेराव यांनी अत्यंत कल्पक असे साजेसे रेखाटलेले मुखपृष्ठ कवितासंग्रहाची गोडी आणि गुढता वाढविते.”चांगभलं” च्या मुखपृष्ठाकडे पाहताच पंढरपूरच्या ‘विठ्ठलाचे’ दर्शन होते, आणि हो, पोलीस विभागात कार्यरत असलेले कवी अरुण घोरपडे यांचा “चांगभलं” कवितासंग्रह वाचला की आपणाला कवी अरुण घोरपडे मध्येच वारकऱ्याचे रूप सामावलेले दिसून येते.

“चांगभलं” हातात पडताच बहात्तर कविता सहजच वाचून झाल्या, समजल्या आणि उमगल्या सुद्धा.मी त्या कविता म्हणून नव्हे तर अभंगच सहज वाचत गेलो आणि वाचत असताना त्यातील गर्भित आशय मेंदूच्या पेशी पर्यंत पोहोचून काही वेळेस माझ्या देहाची विना झंकारायला लागली.

देवा पांडुरंगा सोड तुझी वीट

उभा कर नीट, कास्तकारा

अभंगाचे डोही बुडालोया आता

लिहावया गाथा, दुःखीतांची

उजेड पाडाया,अंधाराच्या राती काळजाच्या वाती, पेटवू या

असे म्हणणारा कवी मला संतपरंपरेतील विचारांचा पाईक वाटतो. पुढ्यात जे जे वाढून ठेवलंय, ते ते स्वीकारत जाणं आणि ते स्वीकारताना कोणाबद्दल दुरावा नाही की असूया नाही.

जसे –

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती

देह कष्टविती परोपकारे…

एवढा सात्विक भाव “चांगभलं” मधील कवितांतून दिसून येतो.

‘चांग’ म्हणजे चांगले आणि ‘भलं’ म्हणजे लाभदायक किंवा कल्याणकारी. ईश्वराच्या नावाचा आनंददायी सकारात्मक ऊर्जा देणारा जयघोष म्हणजे “चांगभलं”. कवीच्या मनातील तळमळ ही साधारण लोकांच्या जीवनातील अंधारमय आणि दुःखाने ग्रासलेले आयुष्य दूर करून आनंददायी जीवनासाठी आनंदाचा उजेड पाडून आपल्या काळजाच्या वाती पेटविण्याची तयारी दर्शविणारी आहे.

वांझोटे साहित्य, लागू नये बट्टा

समाजाचा सट्टा ,लावू नये

लेखनीचे शस्त्र, पाजवारे आता

खरीखुरी गाथा, लिहावया

वेदांमध्ये ‘सर्वेत्र सुखिनं: सन्तु ‘ अशी जी विश्वकल्याणाची प्रार्थना केली आहे, त्याच शब्दाचे साधे सरळ रूप म्हणजे “चांगभलं”.अत्यंत सोप्या भाषेतून आणि शब्दातून भक्त देवाच्या हृदयात कसा ठाव घेतो हे कवीच्या अभंगातून दिसून येते.

सावळ्या रे तुझ्या,पडतो मी पाया

वावरात माया , ढग आन

किंवा

जगासाठी इटू, ढगाचे घे रूप

दुःखी आहे खूप,बळीराजा

पांडुरंगा धाव, दुष्काळात गाव

रूप तुझ, दाव ढगांमध्ये

साधी सरळ माणसं ही ओढ लावणारी असतात.ओढ लागणे म्हणजे काय हे जीव लावल्याशिवाय समजत नाही.  “चांगभलं” रूपाने कवी अरुण घोरपडे यांचा समाजाप्रती जीव लागला असल्याचे प्रकर्षाने जाणवते, असे जीव लावून केलेले कार्य हे सार्वत्रिक होते. म्हणूनच “चांगभलं” कवितासंग्रह साध्या सरळ भाषेतील नक्षत्राचं देणं आहे. कवी अरुण घोरपडे यांचे जवळ शब्दांची वाणवा नाही. संत तुकाराम महाराज म्हटल्याप्रमाणे-

आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने

शब्दांचीच शस्त्रे, यत्ने करू

शब्दची अमुच्या, जीवाचे जीवन

शब्दे वाटू धन, जनलोका

संत तुकारामांचे शब्द, कवी यशवंत मनोहर यांचे शब्द आणि अरुण घोरपडेंचे शब्द काही वेळेस हातात हात घालून समाजातील दांभिकतेवर प्रहार करताना दिसतात.

मंदिरात तुला, नैवेद्य तुपाशी

पोर ही उपाशी, शाळेतली

धाव देवा आता, बंद झाली शाळा

वेदनेच्या कळा,जाणं जरा

प्रत्येक अभंगानंतर कवीची लेखणी सिद्धहस्त होत जाताना दिसून येते. कवींनी संत कबीर , तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांच्या आचरणाचे धडे सांगितलेले आहे.

आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीतून पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मुखातून माझा अभंग निनादत राहो हा आशावाद व्यक्त करताना कवी म्हणतो-

तुझ्या भक्तीमध्ये, रमले हे मन

गातो तुझे गाणं, अभंगात

वारीत निनादो, कवीचा अभंग

माऊलीचा संग, पंढरीत

कवी पोलीस विभागात कार्यरत असल्यामुळे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्यप्रमाने पोलिसांचे कौतुक केलेले आहे –

देवासमह आहे, पोलीस माऊली

लगेच धावली,संकटात

मदतीला सदा, असतो तयार

एकमेव यार, पोलीस हा

कवी अरुण घोरपडे यांनी माणुसकी, समाजभान ,आपुलकी ,आनंद ,आक्रोश, मतभेद, जात ,मतदान ,आश्रमशाळा, संवेदना, मोबाईल, ढग यासारख्या समाजातील अनेक ज्वलंत घटकांवर प्रकाश टाकलेला आहे.

शेतीतील बैलजोडी पासून तर कापसाच्या पांढऱ्या सोन्यापर्यंत आणि साहित्यिकांपासून तर भोंदू साधूपर्यंत कवितेच्या माध्यमातून आपल्या विचारांची वाट मोकळी केलेली आहे.मात्र देहाचे चंदन करून उगारणारा कवी प्रत्येक माणसात पांडुरंगाचे रूप पाहतो.

विठू तुझ्या पायी करतो वंदन,

देह हा चंदन उगारतो…

कवी अरुण घोरपडे यांच्याच शब्दांत सांगायचं झाल्यास,

इतरांना सदा, देतो जो आनंद

तो परमानंद,जगी खरा…

हा परमानंद आपल्या सर्वांच्या जीवनात ” चांगभलं ” च्या निमित्ताने थोड्या – फार प्रमाणात नक्कीच निर्माण होईल यात शंका नाही. आणि हिच या कवितासंग्रहाची सार्थकता आहे.     गुरु,शिक्षक आणि अध्यापक आपल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पातळीवर घडवत असतो, त्याचप्रमाणे कविता-अभंग काव्यप्रकार हा सुद्धा वाचक रसिकांना वेगवेगळ्या पातळीवर अनुभूती देत असतो.कठीणातील कठीण गोष्ट जे सोपी करून शिकवितात ते खरे शिक्षक अशाचप्रकारे सर्वसाधारण माणसाच्या हृदयापर्यंत सहज पोहोचणार साहित्य म्हणजे ते निखळ साहित्य.

लेखणीचे शस्त्र, पाजवारे आता

खरीखुरी गाथा, लिहावया

आरोही आणि स्वरोहीच्या रूपाने मुलीचे मोठेपण दर्शविणारा कवी मला प्रत्येक ठिकाणी “बाप” वाटतोय.त्यांच्या “चांगभलं” कवितासंग्रहाला खूप खूप शुभेच्छा आणि दर्जेदार कलाकृती निर्मिती बद्दल अभिनंदन…!

डॉ. विठ्ठल चौथाले (चामोर्शी)