शिक्षणामुळेच विद्यार्थ्याचे जीवन घडते – ॲड. दीपक चटप वरुर रोड येथील वाचनालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

261

राजूरा :प्रत्येक युवक, विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक कार्य व इतर स्वतःला, समाजाला घडवणारी कामे केली पाहिजे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा व सर्व महामानवांनी शिक्षणाचा विचार पेरला आहे. त्यातूनच आदर्श समाजनिर्मीतीचे स्वप्न पाहीले आहे. शिक्षणाला विद्यार्थ्यांनी प्रथम प्राधान्य देण्याची गरज असून शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांचे जीवन घडते असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय चेव्हनिंग स्काॅलर ॲड.दीपक चटप यांनी केले. राजुरा तालुक्यातील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरुर रोड येथील विद्यार्थ्यांना शिक्षणयात्रेदरम्यान भेट देवून त्यांनी मार्गदर्शन केले.

पुढे ते म्हणाले, आजची तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. शैक्षणिकदृष्ट्या उदासीनतेकडे वळत आहे. अशा परिस्थितीत शिक्षणाचं वातावरण आजच्या नव्या पिढीमध्ये तयार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. ॲड. चटप यांनी ब्रिटिश सरकारची जागतिक चेवनिंग शिष्यवृत्ती मिळवून लंडन येथे कायद्याचे उच्चशिक्षण घेतले आहे. वाचनालयाच्या विद्यार्थ्यांनी वरुर रोड येथील गुरुदेव सेवा मंडळातर्फे ॲड.दीपक चटप यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. कार्यक्रमाप्रसंगी साईनाथ पिंपळशेंडे, घनशाम पिंपळशेंडे, गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्षा बेबीबाई धानोरकर, सुरेखा बोरकुटे, सुरेखा जानवे, मीना डहाके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शेंडे तर आभार श्रुती बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण चौधरी, स्वप्नील जिवतोडे, समीक्षा मोडक, समीक्षा जीवतोडे, प्रज्वल बोरकर,मयूर जानवे, सागर बोरकर, तेजस वडस्कर यांनी सहकार्य केले.