यूजीसी नेट परीक्षेत झालेल्या पेपर लीक झाल्याच्या शक्यतेने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने काल झालेली परीक्षाच रद्द केली आहे. याबाबतची माहिती काही वेळापूर्वीच देण्यात आली आहे.
नेट परिक्षेची पारदर्शकता आणि पावित्र्य सुनिश्चित करण्यासाठी UGC-NET जून 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
ही परीक्षा रद्द करून पुन्हा नवीन परीक्षा घेतली जाणार आहे. याची माहिती पुढील काळात जाहीर करण्यात येईस. तसेच पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात येत असल्याचे शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे.
ज्युनिअर रिसर्च फेलाेशिप तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक पदावर नियुक्तीसाठी नेट परीक्षा उत्तीर्ण हाेणे गरजेचे आहे. तसेच युजीसीने जून २०२४ पासून विविध ८३ विषयांमध्ये पीएच.डी ला प्रवेश घेण्यासाठी नेट परीक्षा अनिवार्य केली आहे. त्यामुळे दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत ही परीक्षा घेतली जाते. मागीलवर्षी ऑनलाइन परीक्षेदरम्यान आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे दोन तास परीक्षा उशिरा सुरू झाली होती. यावर्षी अशाप्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून १८ जूनला ‘नेट’ची परीक्षा ऑफलाईन घेण्यात आली. दोन शिफ़्टमध्ये या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते.