जिवती : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त व अतिदुर्गम असलेल्या जिवती तालुक्याचे दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी दिपक साबने यांनी पत्रकारिता क्षेत्रात मागील दहा वर्षात आपल्या पत्रकारितेतून अनेक वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देईपर्यंत पाठपुरावा केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना प्रसिद्ध अभिनेत्री तथा नृत्य मार्गदर्शक रश्मी देशमुख यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर कंवेंशन सेंटर, नागपूर येथे “विदर्भ गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे प्रा. पांडुरंग सावंत व सामाजिक कार्यकर्ता सुनील राठोड यांचाही सन्मान करण्यात आला.
एस.आर.एन.फिल्म प्रोडक्शन, इंडिया न्यूज २४, व जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने “विदर्भ गौरव पुरस्कार” वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान म्हणून ओळखला जातो. या सोहळ्यात राज्यातील क्रीडा, पोलिस, वन, आरोग्य, शिक्षण, पत्रकारिता या विभागातील तसेच नाट्य व सिनेमा कलावंत, गायक, नृत्य, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध व्यक्तिमत्त्वांना पुरस्कार देऊन गुण गौरव करण्यात आला. हा सोहळा दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे विदर्भाध्यक्ष राज वाधे, अभिनेता – दिग्दर्शक-निर्माता संजय भाकरे, अभिनेता- दिग्दर्शक-लेखक तथा दादासाहेब फाळके चित्रपट युनियन, नागपूरचे जिल्हाध्यक्ष सागर निकम, सिनेअभिनेत्री व न्युज इंडिया २४ च्या संपादिका शीतल नंदनवार, फर्स्ट आर्चर इंडिया अभिषेक ठवरे, जन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रतीक पांडे यासह इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
सोहळ्यात खास विदर्भातील लावणी फेम दिव्या साळुंके हिने लावणी सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.अनेक कलाकारांनीही आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. सूत्रसंचालन अंकिता बोंद्रे यांनी केले. प्रास्ताविक प्रतीक पांडे यांनी तर राजू बर्डे यांनी आभार मानले.