बळीराम काळे, जिवती
जिवती (ता.प्र.) : घुस्साडी दंडार च्या माध्यमातून बंधुत्वाचे दर्शन, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हा गोंडी संस्कृतीचा पाया आहे; आणि निसर्गाचे रक्षण करणे हा गोंडी संस्कृतीचा गाभा आहे. गुस्साडी’ हा आदिवासींचा एक प्राचीन लोकनृत्य प्रकार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवरील जिवती, कोरपना व राजुरा अनेक तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर शेकडो वर्षांपासून दिवाळी सणानिमित्त दरवर्षी ‘गुस्साडी’ या लोकनृत्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. आदिवासी समुदाय पारंपरिक रंगीबेरंगी पोशाख परिधान करून, दागिन्यांनी सजून नाचत गात शेजारच्या गावांना भेट देतात. सर्व समुदाय एकत्र येतो, तिथे ‘आखाडा’ भरतो. शेकडो वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात असून आदिवासी बांधवांकडून संस्कृतीचे जतन केले जात आहे.
दिवाळीच्या आधीच्या दहा दिवसांत तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी गावात हा उत्सव साजरा केला जातो. याद्वारे आदिवासींना भेडसावणाऱ्या प्रमुख समकालीन समस्यांबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी हे एक व्यासपीठ देखील प्रदान करते. या कृषिप्रधान भागात या जमातीचे धार्मिक सण हे शेतीच्या हंगामाभोवती फिरतात आणि हा कापणीनंतरचा सर्वांत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. दिवाळीत आदिवासी पाड्यांवर ‘दंडार’ भरविली जाते. या दंडारीला सातशे आखाडा नऊशे बेताल (७०० मैदान, ९०० प्रकारच्या कवायती, खेळ) म्हणजेच ‘आखाडा’ असे संबोधले जाते.
दिवाळीच्या निमित्ताने सर्व समुदाय एकत्र येऊन ज्याच्या घरी आखाडा असतो, त्याच्या घरी हा उत्सव साजरा केला जातो. यात प्रामुख्याने महिला व पुरुष मंडळीचा सहभाग असतो. महिला नर्तक विविध आभूषणे, दागिने परिधान करत शेजारच्या गावांना भेटी देऊन पूर्वजांचे, गोंडी संस्कृतीचे व देवीदेवतांचे गाण्याच्या माध्यमातून स्मरण करतात. ‘येथमासुरपेन ‘किंवा आत्म्याचा देव आणि जंगो देवीची पूजा केली जाते. डप्पू, घुमेला, ढोल, वेट्टे, परा, पेपरी आणि तुडूम अशी वाद्ये वाजवून नृत्य सादर केले जाते. कुटुंबातील पुरुष सदस्य मोरांच्या पिसांची पगडी, हरिणाची शिंगे, कृत्रिम दाढी आणि मिशा लावतात. तर, अंग झाकण्यासाठी बकरीचे कातडे पांघरले जाते.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, कोरपणा राजुरा तालुक्यातील हा उत्सव येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करतो. पौर्णिमेच्या दिवशी सुरू झालेला हा उत्सव चौदाव्या दिवसांपर्यंत चालतो. या उत्सवामुळे चालत आलेला वारसा व संस्कृतीचे जतन व संवर्धन होत आहे. महाराष्ट्रच्या बहुतांश जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी गावात हा उत्सव साजरा केला जातो.