प्रितम म गग्गुरी(उपसंपादक)
खमणचेरू : सुरजागड लोहप्रकल्पाच्या असंवेदनशीलतेमुळे परिसरात अपघातांचे सत्र संपता संपेना. काल, ११ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ७:३० वाजता सुभाषनगर मुक्तापुर गावाजवळ एक धक्कादायक अपघात झाला, ज्यात आल्लापल्ली येथील युवक रिजवान शेख जागीच ठार झाला. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुरजागड लोहप्रकल्प सुरु झाल्यापासून या मार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे, मात्र प्रशासन, लोकप्रतिनिधी, आणि लोहप्रकल्पातील अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत. रस्त्याची दुरवस्था आणि धुळीचा प्रकोप यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर पाणी टाकून धुळीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असला तरी रस्ता चिखलमय झाल्याने दुचाकीस्वाराचे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत.
प्रशासनावर कडक टीका:
सुरजागड लोहप्रकल्पामुळे परिसराच्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे या भागातील नागरिक हताश झाले आहेत. अपघातांमध्ये होणारी वाढ ही फक्त रस्त्याच्या खराब स्थितीचा परिणाम नाही, तर प्रशासनाची उदासीनता आणि त्याचे दुर्लक्ष देखील मुख्य कारण ठरले आहे.
“आमच्या जीवाची सुरक्षा ही प्रशासनाची जबाबदारी आहे, पण त्यांच्याकडून कोणताही ठोस उपाययोजना होत नाही. आजवर अनेक लोक या अपघातांमध्ये जीव गमावले आहेत, पण प्रशासन अजूनही कोणतीही ठोस कारवाई करत नाही,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
सुरजागड लोहप्रकल्पामुळे धुळीचे प्रमाण, रस्त्याची दुरावस्था, आणि वाढती अपघातांची संख्या ही मोठी समस्या बनली आहे. प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करून सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.