बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करावी – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

370

 

बुलडाणा,  दि. 29 : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग हा शहर पाठोपाठ खेड्या गावांमध्ये देखील वाढतांना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात कोरोना संसर्ग आटोक्यात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. गावामध्ये बाहेर गावावरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात यावी. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामस्थ व प्रशासनाने सजग असावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केल्या.

संग्रामपूर तालुक्यातील वरवंड, सोनाळा, निवाना, तसेच पातुर्डा या गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे या पार्श्वभूमीवर पंचायत समिती कार्यालय, संग्रामपूर येथे पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी आढावा बैठक घेतली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तींची वैद्यकिय तपासणी करण्याचे आदेशही यावेळी पालकमंत्री यांनी दिले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार, गट विकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.