ब्रम्हपुरी
तालुक्याच्या बाजूने वैनगंगा नदी वाहते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सततच्या पावसामुळे व वैनगंगा नदिवर असलेल्या गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने नदि दुथडी भरुन वाहत असुन नदिला पुर आलेला आहे. नदिला मिळणाऱ्या नाल्यामध्ये पुराचे पाणी घुसत असल्याने सदर पाणी शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात घुसले आहे
त्यामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या पिंपळगाव(भो.) गावामधील एका चौकात पुराचे पाणी शिरले आहे.
तर पिंपळगाव(खरकाडा) या गावामध्ये जाणाऱ्या खरकाडा व निलज रसत्यावरून पुराचे पाणी वाहत असल्याने या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. सोबतच बेलगाव, कोलारी या गावांचा सुध्दा संपर्क तुटलेला आहे.
पुराचा फटका नदिकाठावर असलेल्या अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव(भो.), भालेश्वर, चिखलगाव, सोंद्री, चिंचोली, सावलगाव, सोनेगाव, बोळेगाव, खरकाडा, रणमोचन, पिंपळगाव(ख), चिचगाव, आवळगाव, हळदा, कोलारी, बेलगाव शेतशिवारातील शेतातील पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.
सोबतच गांगलवाडी-आवळगाव, देऊळगाव-कोलारी, पारडगाव-ब्रम्हपुरी या मार्गावरून वाहणाऱ्या नाल्याला पुर आल्याने तो मार्ग बंद झालेला आहे.
वैनगंगा नदिला पाणी वाढत असल्याने नाल्याना दाब येत असल्याने पुराचे पाणी नदिकाठालगत असलेल्या गावात घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोबतच तालुक्यातील लाडज हे गाव नदिच्या पात्राने चारही बाजूंनी वेढलेले असल्याने दहा दिवसांपुर्वीच सदर गावाचा तालुक्याशी संपर्क तुटलेला असुन गावात पुराचे पाणी शिरले आहे.
या गावातील नागरिक अत्यावश्यक कामांसाठी नावेने नदितुन जीवघेणा प्रवास करत आहेत.