एखाद्या मेंढीची जास्तीत जास्त किंमत किती असेल? असा प्रश्न कुणाला केला तर कुणी फार फार तर सांगेल १ लाख रूपये किंवा २ लाख रूपये. पण एक मेंढी अशी आहे जिला एक किंवा दोन लाख रूपये नाही तर चक्क कोटींमध्ये किंमत मिळाली आहे. स्कॉटलॅंडमध्ये टेक्सल प्रजातीची एक मेंढी चक्क ३.५ कोटी रूपयांना विकली गेली आहे. ही जगातली सर्वात महागडी मेंढी ठरली आहे.
स्कॉटलॅंडच्या लनामार्कमध्ये स्कॉटीश नॅशनल टेक्सल सेलमध्ये गुरूवारी ही मेंढी विकण्यात आली. या मेंढीचा लिलाव करण्यात आला. सुरूवातीला या मेंढीची किंमत १०,५०० डॉलर इतकी होती. हळूहळू बोली वाढत गेली. ही मेंढी घेणाऱ्यांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली होती. शेवटी ही मेंढी ४९०, ६५१ डॉलरमध्ये विकली गेली.
भारतीय करन्सीत ही रक्कम ३.५ कोटी रूपये इतकी होते. ही मेंढी डबल डायमंड नावाने ओळखली जाते.
ही मेंढी तीन लोकांनी मिळून खरेदी केली. ही जगात सर्वात जास्त किंमतीत विकली गेलेली पहिली मेंढी आहे. या मेंढीसाठी आतापर्यंतची सर्वात जास्त रक्कम देणाऱ्या तिघांपैकी एक असलेले जेफ ऐकेन म्हणाले की, ‘प्रत्येकवेळी काहीतरी विशेष सोबत येतं आणि काल असाच दिवस होता. जेव्हा एक विशेष टेक्सल समोर आली. प्रत्येकाला ही मेंढी खरेदी करायची होती’.
टेक्सल ही फार दुर्मीळ प्रजातीची मेंढी आहे. यांची मागणीही सर्वात जास्त आहे. नेदरलॅंडच्या तटापासून टेक्सेल एका छोट्या द्वीपांवर आढळतात. तशी तर सामान्यपणे यांची किंमत ५ अंकी असते. पण यावेळी ही किंमत फार जास्त झाली.