पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्ह्यातील सिंचन समस्या सोडविण्यासाठी पुढाकार

518

तळोधी व रेगुंठा उपसा सिंचनसाठी 27 कोटी रूपये निधीची तरतुद

नक्षलग्रस्त भागातील पोलीस विभागालाही 58 कोटी रुपयांची तरतूद

गडचिरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील तळोधी मोकासा व सिरोंचा येथील रेगुंठा उपसा सिंचन योजना पुर्ण करण्याकरीता पुरवणी मागणीद्वारे 27 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जिल्हयातील स्थानिक आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.देवराव होळी तसेच आमदार कृष्णा गजबे यांनी वेळोवेळी या विषयांबाबत पालकमंत्री यांचेकडे प्रश्न मार्गी लावण्याबाबत विचारणा केली होती. गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त संवेदनशील जिल्हा असून 78 टक्के वनक्षेत्र आहे. या जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी यापूर्वी चिंचडोह प्रकल्प मार्गी लागला असून कोटगल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवर तळोधी मोकासा येथील उपसा सिंचन प्रकल्पाचे काम तसेच सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा उपसा सिंचन प्रकल्पाचे काम गतीने पुर्ण करण्याचा दृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याचे पालकमंत्री यांना विनंती केली होती. त्याअनुषंगाने पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून या दोन्ही प्रकल्पासाठी एकूण 27 कोटी रुपयांची तरतूद सन 2020-21 च्या पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे तळोधी मोकासा प्रकल्पातील 16 गावातील 6062 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. तर रेगुंठामुळे 17 गावातील 3283 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या कामी पुढील लागणारा आवश्यक निधी टप्याटप्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

तळोधी मोकासा उपसा सिंचन योजना* : नक्षलप्रवण आदिवासी भागातील चामोर्शी तालुक्यातील दर्शनीमाल गावाजवळ वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर या योजनेचे काम सुरू आहे. या योजनेची प्रस्तावित सुधारीत प्रशासकिय मान्यता 155.45 कोटी रू.ची आहे. चिचडोह प्रकल्प पुर्ण झाला असून त्यामुळे या योजनेचे काम पुर्ण झाल्यास यातून चिचडोह प्रकल्पामुळे शाश्वत सिंचन सुरू ठेवता येणार आहे. आत्तापर्यंत 19 टक्के खर्च या योजनेवर झाला आहे. यात 8.32 कोटी रू. झालेल्या कामापैकी दिले आहेत तर 2.30 कोटी देयके देणे बाकी आहेत. सदर प्रकल्पास सद्या मंजूर निधीमुळे गती मिळणार असून अंदाजे जून 2022 मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.

*रेगुंठा उपसा सिंचन योजना* : सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा गावाजवळ प्राणहिता नदीच्या डाव्या तीरावर या योजनेचे काम सुरू होणार आहे. सुधारीत प्रशासकिय मान्यतेसाठी या योजनेचा खर्च 102.36 कोटी प्रस्तावित आहे. पैकी 1.37 कोटी खर्च करण्यात आला आहे. या योजनेची पुर्ण उभारणी सन 2024 पर्यंत पुर्ण होणार आहे. यासाठी शासनाकडून वेळेत टप्याटप्याने निधी वितरण केले जाणार आहे.

*नक्षलबाधित उपाययोजनांसाठी तीन जिल्हयांना 58 कोटी रूपयांची तरतूद*

गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोलीस मदत केंद्रे,आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पुनर्वसन, नक्षल हल्यामध्ये मृत्युमूखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांना सानुग्रह अनुदान, जनजागरण मेळावे व इतर कामाकरीता एकूण 58 कोटीच्या सन 2020-21 च्या पुरवणी मागणीस मान्यता देण्यात आली आहे. यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.