शेतकऱ्यांच्या पिकांच्या उत्पादकते नुसार शासनाने नेमलेल्या एजन्सी मार्फत होत असलेल्या मालाच्या एकरी खरेदीची मर्यादा वाढविण्यात यावी. – आमदार सुभाष धोटे

1114

राजुरा (ता.प्र) :– शेतकरी बांधव विविध पिकांचे उत्पन्न घेत असतात. खरीप हंगामात कापुस, सोयाबीन व तुर तर रबी हंगामात हरभरा, गहु या पिकांचे उत्पन्न घेत असतो. शेतकरी आपला माल स्थानिक बाजारपेठेत विकत असतो. परंतु कधी-कधी बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्यामुळे किमांन आधारभुत किंमत देण्यासाठी काही कृषी मालाची खरेदी शासनाने नेमलेल्या एजन्सी मार्फत होत असते. जसे कापसाची खरेदी सीसीआय किंवा महाकॉट मार्फत तर सोयाबिन, तुर या पिकांची खरेदी नाफेड मार्फत होत असते. परंतु हे करीत असतांना शेतकऱ्यांकडुन फक्त मर्यादीत उत्पन्नच या एजन्सी मार्फत खरेदी केल्या जाते. उदा. कापुस एकरी 10 क्विंटल तर तुर, हरभरा व सोयाबीन यांची सुध्दा मर्यादा ठरविली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन झालेला आपला जास्तीचा माल व्यापाऱ्यांना पडेल त्या भावात विकावा लागतो त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत असते. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी शेतकऱ्यांच्या पिकांच्या उत्पादकते नुसार शासनाने नेमलेल्या एजन्सी मार्फत होत असलेल्या मालाच्या एकरी खरेदीची मर्यादा वाढवावी अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे केंद्र शासनाचे धोरण आहे. त्या धोरणानुसार शेतकरी नव नविन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपली उत्पादकता वाढवित आहे. कापुस पिकामध्ये बि-टी तंत्रज्ञान आल्यापासुन पिकांची उत्पादकता वाढलेली आहे. एकरी 20 क्विंटल पर्यंत शेतकरी कापुस पिकाचे उत्पादन घेत आहे. हरभरा मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी 10 क्विंटल उत्पन्न शेतकरी घेत आहे. सोयाबीन व तुर मध्ये सुध्दा उत्पादकता वाढलेली आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनमान्य एजन्सी मार्फत खरेदी होत असतांना एकरी उत्पन्नाची जी मर्यादा घातली आहे ती वाढविण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल यासाठी शेतकऱ्यांच्या पिकांच्या उत्पादकते नुसार शासनाने नेमलेल्या एजन्सी मार्फत होत असलेल्या मालाच्या एकरी खरेदीची मर्यादा वाढविण्यात यावी हि मागणी राजुरा विधानसभा मतदार संघाचे आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदान्द्वारे केली आहे.