नगराळा येथे ११ केव्ही नविन फीडर कार्यान्वित: आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते उद्घाटन

1162

फीडरद्वारे १४ गावांना विजपुरवठा : सुमारे ८५० ग्राहकांना लाभ

राजुरा (ता.प्र) :– विद्युत उपकेंद्र जिवती येथून निघणाऱ्या सर्वात जास्त लांबीच्या ११ केव्ही टेकामांडवा फीडरचे विभाजन करुन तयार झालेल्या नगराळा येथील नवीन ११ केव्ही फीडरचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
वीज ग्राहकांना अखंडित व योग्य दाबाचा विजपुरवठा करण्याच्या महावितरण कंपनीच्या धोरणान्वये, जिवती उपविभागातील सर्वात जास्त लांबीच्या ११ केव्ही टेकामांडवा फीडरचे विभाजन करुन नगराळा येथील नवीन ११ केव्ही फीडरची निर्मिती करण्यात आली. सदर काम प्रिव्हेंटिव मेंटेनन्स अंतर्गत नवी लिंक लाईन व जुन्या वाहिनीची दुरुस्ती करुन करण्यात आले. हे काम मे. उमंग ईलेक्ट्रिकल्स, कोरपणा यांनी जिवती उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मांगीलाल राठोड व कनिष्ठ अभियंता विक्की नागदेवे यांच्या देखरेखीखाली केले.
आधीचे टेकामांडवा फीडर हे जिवती-शेणगांव मुख्य रस्त्याच्या उत्तर व दक्षिणेकडे अशा दोन भागात विस्तारलेले होते.तेंव्हा कोणत्याही एका भागातील वाहिनीमध्ये दोष निर्माण झाले तरी पूर्ण फीडर बंद होत असे. व वीज ग्राहकांना खंडित विजपुरवठ्याचा सामना करावा लागत असे. आता विभाजनामुळे मात्र दक्षिणेकडे जुने टेकामांडवा फीडर असून उत्तरे कडे नवीन नगराळा फीडर तयार झाले आहे. दोन्ही फीडरची लांबी कमी झाल्यामुळे ब्रेकडाऊन झाल्यास वाहिनीवरील दोष कमीतकमी वेळेत शोधून ती लवकर सुरू करता येते.तसेच विद्युत दाबामध्ये सुधारणा होते.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले अखंडित वीज वितरण ही आवश्यक गरज आहे, परिसरातील समस्या लक्षात घेऊन आवश्यक सुधारणा करण्यात येत आहे. या विभाजनामुळे जुन्या टेकामांडवा फीडरद्वारे १९ गावांना व नवीन नगराळा फीडरद्वारे १४ गावांना विजपुरवठा केला जाणार असून सुमारे ८५० ग्राहकांना याचा लाभ होणार आहे.
या प्रसंगी राजुरा उपविभागीय अधिकारी जनार्धन लोंढे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे, उपकार्यकारी अभियंता राठोड, काँग्रेस कमीटी जिवती तालुकाध्यक्ष गणपतराव आडे, माजी प स सदस्य सुग्रीव गोतावळे, ताजुद्दीन शेख, दत्ता राठोड व विज वितरण कर्मचारी उपस्थित होते.