हाथरस घटनेतील नराधमांना फाशी द्या: वं.ब.आ चे ठाणेदारांना निवेदन

569

धाबा/अरूण बोरकर

हाथरस येथील बलात्कार प्रकरणातील क्रूर घटनेचा निषेध नोंदवित सदर प्रकरणातील नराधमांना तात्काळ फाशी द्या, व योगी सरकार बरखास्त करा,या मागणीचे निवेदन गोंडपिपरी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी,व सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या वतीने महामहीम राष्ट्रपती व पंतप्रधान यांना येथील ठाणेदार यांच्या माध्यमातून निवेदन सादर केले.
उत्तर प्रदेशातील हा हाथरस येथील घटनेने अख्खा देश हादरला. या घटनेतील काही नराधमाने येथील एका दलित मुलीवर बलात्कार करून तिची जीभ कापली, मनका तोडला, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. एकंदरीत हा सारा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा आहे. यामुळे या घटनेने संपूर्ण देश पेटून उठला असताना क्रूररित्या घडलेले बलात्काराचे प्रकरण उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या पोलिसांनी मात्र दडपण्याचा प्रयत्न केला आहे. पिडीत तरुणीला येथील पोलिसांनी तिच्या कुटुंबाला कुठलीही पूर्वकल्पना न देता तीच्यावर मध्यरात्रीच परस्पर अंत्यसंस्कार केले. व संबंधित अधिकाऱ्यांनी बलात्कार झालाच नसल्याचे सांगत प्रकरणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून पीडितेच्या कुटुंबीयांना सातत्याने धमकावण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे उत्तर प्रदेशातील गेल्या अनेक दिवसांपासून कायदा व सुव्यवस्थेची एैसी तैसी होत असून सातत्याने होत असलेल्या बलात्काराच्या घटनांची राज्यातील दलित,मागासवर्गीय असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.
सदर प्रकरण लक्षात घेता तातडीने बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्यात यावी.सोबतच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यास अपयशी ठरलेले योगी सरकार बरखास्त करावे. अशी मागणी करणारे निवेदन गोंडपिपरी वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या वतीने येथील ठाणेदार संदीप धोबे यांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून मागणी करीत घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी सुरेश दुर्गे जिल्हा सल्लागार वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर , सुरेंद्र मांदाडे जिल्हा सदस्य चंद्रपूर,संदेश निमगडे तालुका महासचिव गोंडपिपरी,विजय दुर्गे तालुका उपाध्यक्ष,उद्धव नारनवरे आंबेडकरी विचारवंत , डॉ. प्रकाश तोहोगावकर तालुका संघटक, डॉ.मोहनदास डोंगरे , संजय कांबळे,अभिजित दुर्गे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.