अबब! मुलीच्या जन्मासाठी त्यांनी दिला तब्बल १४ मुलांना जन्म…

576

लेकव्ह्यू (मिशिगन-अमेरिका):- तीन दशके आणि 15 वेळा अपत्य जन्मासाठी प्रयत्न केल्यानंतर मिशिगन दांपत्याला मुलीची प्राप्ती झाली आहे. या आधी या दांपत्याला टायलर, झाक, ड्र्यू, ब्रँडन, टॉमी, विनी, केल्विन, गेब, वेस्ली, चार्ली, ल्युक, टकर, फ्रान्सिस्को आणि फिन्ले असे 14 मुलगे आहेत.
भारतासारख्या देशात आजही अनेक कुटुंबे वंशाला दिवा हवा म्हणून मुलगा होण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यासाठी बेकायदेशीरपणे लिंगपरिक्षण आणि स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार अनेकदा उघड होतात. सरकारने कितीही कडक कायदे केले तरी गैर मार्गाने पैसा मिळवण्यास चटावलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील काही व्यक्ती लिंगपरिक्षणासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढत असतात आणि अविचारी जनता मुलगा व्हावा म्हणून त्यांच्याकडे धावत असते.
अमेरिकेतील घटना मात्र यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तिथल्या दांपत्याला मुलगी हवी होती. म्हणून ते गेली तीस वर्षे प्रयत्न करत राहिले. त्यामध्ये त्यांना तब्बल 14 मुलगे झाले. मुलगी हवी म्हणून त्यांनी मुलग्यांचे भ्रूण मारून टाकले नाहीत तर त्यांना जन्म दिला. शेवटी पंधराव्या प्रयत्नांत त्यांच्या घरात मुलीचा जन्म झाला आणि सगळ्यांनी आनंद साजरा केला. आता मुलीच्या रुपाने त्यांच्या कुटंबात 17 व्या व्यक्तीचा समावेश झाला आहे.
मॅगी जेन आणि जे श्वान्ड्ट असे या दांपत्याचे नाव आहे. डेट्रॉईट फ्री प्रेसने ही बातमी प्रथम दिली. त्यांच्या प्रतिनिधीशी बोलताना दांपत्याने सांगितले की, हे वर्ष आमच्यासाठी अनेक कारणांमुळे अविस्मरणीय आहे. पण आम्ही कल्पनाही करू शकत नाही, अशी देणगी मुलीच्या रुपाने आम्हांला मिळालेली आहे.
श्वान्ड्ट दांपत्याचा विवाह 1993 मध्ये झाला. दोघेही आता 45 वर्षांचे आहेत. तिथल्या स्थानिक माध्यमांना त्यांची चांगली ओळख आहे. कारण त्यांच्याकडे जन्मलेल्या प्रत्येक अपत्याच्या वेळी तो मुलगा की मुलगी याच्या बातम्या गेली कित्येक वर्षे येत आहेत. त्यांचा स्वतःचा लाईव्ह टीव्ही शो देखील आहे. फोर्टीन आऊटडोअर्समेन असे त्याचे नाव आहेत.
आता मुलीच्या आगमनाने त्यांना शो च्या नावाबाबत नव्याने विचार करावा लागेल. त्यांना 2018 मध्ये जेव्हा फिन्ले नावाचा 14 मुलगा झाला तेव्हादेखील वुड-टीव्हीच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले होते की, जन्माआधी आम्ही कधीही गर्भाची लिंगचाचणी करणार नाही.
आता त्यांचा सर्वात थोरला मुलगा टायलर श्वान्ड्ट आता 28 वर्षांचा आहे. आता घरात मुलगी आल्याने सगळ्या भावांना जुळवून घ्यावे लागणार आहे. विशेषतः टॉयलेट स्वच्छ ठेवण्याबाबत असे तो म्हणाला.