बापरे! सहा वर्षाचा मुलगा झाला कॉम्प्युटर प्रोग्रॅमर…गिनीज बुक मध्ये नोंद

566

अहमदाबाद, 10 नोव्हेंबर: ध्येय साध्य करण्याची जिद्द असली की कोणतीही गोष्ट अशक्य नसते. ध्येयवेड्या लोकांना वयाचं कोणतही बंधन नसतं. अहमदाबाद इथे राहणाऱ्या एका चिमुरड्याने वयाच्या 6व्या वर्षी जबरदस्त करामत करुन दाखवली आहे. सर्वात कमी वयाच्या कॉम्प्युटर प्रोग्रामर होण्याचा मान त्याला मिळाला आहे. अर्हम ओम तलसानिया असं या मुलाचं नाव आहे. अर्हमने पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज क्लिअर करत एक विक्रम केला आहे. त्याने पिअर्सन VUE टेस्ट सेंटरमधून परीक्षा देत मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्र मिळवलं.

अर्हमला कॉम्प्युटर कोडिंगचे धडे त्याच्या वडिलांकडून मिळाले. वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षापासून त्याला टॅब वापरता येतो. हळूहळू तो कोडिंगही व्यवस्थित शिकला. अर्हमचे वडील ओम तालसानिया सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्याचे वडील म्हणले, ‘अर्हमला कॉम्प्युटर आणि गॅझेट्सची आवड होती. त्यामुळे मी त्याला कोडिंग शिकवलं. लहान असल्यापासूनच तो टॅबलेटवर गेम खेळायचा. स्वत:चे गेम्स स्वत: बनवू लागला. मी कोडिंग करत असताना तो पाहायचा आणि त्यालाही हे शिकून घेण्याची आवड निर्माण झाली. त्याच्या कलाने सगळं प्रोग्रामिंग, कोडिंग शिकवलं.’

अर्हमने सांगितलं, ‘मला पायथॉनकडून सर्टिफिकेट मिळालं, तेव्हा मी लहान खेळ तयार करत होतो. त्यानंतर त्यांनी मला कामाचा पुरावा पाठवायला सांगितला. काही महिन्यांनंतर त्यांनी माझ्या कामाला मान्यता दिली आणि माझी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.’ अर्हमच्या या उत्तम कामगिरीमुळे त्याच्या आई- वडिलांचा उर अभिमानाने भरुन गेला आहे. अर्हमने अशीच प्रगती करत रहावी अशी आशा त्याच्या आईने व्यक्त केली आहे….