दारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात

861

पार्टी सुरू असताना दारू संपल्याने उपस्थित लोकांनी अल्कहोलयुक्त सॅनिटायझर प्यायले. हा निर्णय त्यांच्या अंगलट आला असून यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला, तर दोघे कोमात गेले आहेत. रशियातील ही घटना आहे.

‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, रशियातील तातिन्सकी जिल्ह्यातील तोमतोर गावात 9 जण पार्टीसाठी जमा झाले होते. पार्टी ऐन रंगात आली असताना दारू संपली. यामुळे या 9 जणांनी सॅनिटायझरचे सेवन केले. या सॅनिटायझरमध्ये जवळपास 69 टक्के मिथेनॉल होते.

कोरोना काळात हात जंतूमुक्त करण्यासाठी विकले जाणारे हे सॅनिटायझर प्यायल्याने पार्टीत उपस्थित सर्वांचीच प्रकृती बिघडली. यातील तिघांचा गावीच मृत्यू झाला. अन्य 6 जणांना उपचारासाठी विमानाने राजधानी याकुत्स्कला नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना 4 जणांची प्राणज्योत मालवली. दोघे अद्यापही कोमात आहेत. या प्रकरणी पोलिसात सॅनिटायझरमुळे विषबाधा झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, सॅनिटायझरचे सेवन केल्याने 7 जणांचा मृत्यू झाल्याने रशियन सरकार खडबडून जागे झाले आहे. सरकारने लोकांना दारूला पर्याय म्हणून सॅनिटायझर न पिण्याचे आवाहन केले आहे.