ओबीसी विशाल मोर्चाला राजुरा तालुका काँग्रेसचा जाहीर पाठिंबा…

422

राजुरा (ता.प्र) : — दिनांक २६ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर येथे होणाऱ्या ओबीसी विशाल मोर्चाला राजुरा तालुका काँग्रेस कमेटी आणि संपूर्ण काँग्रेस प्रेमी नागरिकांचा जाहीर पाठिंबा दिला आहे.

संपूर्ण भारतात ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या किती आहे, हे कळणे अत्‍यावश्यक आहे. ‘१९३३ साली इंग्रजांच्या कार्यकाळात जनगणना झाली होती, तेव्हा फक्‍त एकदाच ओबीसीची जणगणना करण्यात आली होती. तेव्हा देशात ५४ टक्के ओबीसी समाज असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते.

आरक्षण देताना त्‍याच्या अर्धे २७ टक्‍के आरक्षण ओबीसी समाजाला देण्यात आले. मात्र, सध्या देशभरात ओबीसी समाज नेमका किती आहे, याची निश्चित आकडेवारी उपलब्‍ध नाही. केंद्र पातळीवर जितक्‍या समित्‍या नेमण्यात आल्‍या किंवा विविध न्यायालयात याच्याशी संबंधित जितके विषय आले, त्‍यामध्ये ओबीसी समाजाची आकडेवारी मागण्यात आली आहे. मात्र ती उपलब्‍ध नाही.

आता सन २०२१मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजासाठी वेगळा रकाना नाही. तो असायला हवा. ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे’, अशा व इतर मागण्या घेऊन संविधान दिनी २६ तारखेला चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार आहे.

त्यावेळी राजुरा तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि संपूर्ण राजुरा तालुक्यातील नागरिकांनी पूर्ण ताकतीने रस्त्यावर उतरण्याचे आवाहन आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुका अध्यक्ष रंजन लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा तालुका काँग्रेस कमेटी च्या वतीने करण्यात येत आहे.