भिकारी म्हणून बाहेर काढले; पण त्याने खरेदी केली १२ लाखांची बाईक…

961

कुणाचा वेश कसा आहे? यावरून आपण समोरच्या व्यक्तीबद्दल अंदाज लावत असतो. पण दरवेळी आपला अंदाज बरोबर येईल असं अजिबात नाही. कारण काही वेळा आपला अंदाज पूर्णपणे चुकून खजील होण्याची पाळी सुद्धा आपल्यावर येऊ शकते आणि असाच काहीसा अनुभव थायलंड मधील एका बाईक शो रूमच्या कर्मचाऱ्यांना आला.
झाले असे की एक मळलेला, जुनी विजार आणि पायात स्लीपर घातलेला एक वयस्कर माणूस दुकानाबाहेर उभा राहून बराच वेळ शोरूम मधील बाईक न्याहाळत होता. हे सर्व दृश्य शोरूमच्या कर्मचाऱ्याने बघितले. भिकारी असावा या शंकेने दुकानात आलेल्या एका व्यक्तीला दुकानाबाहेर काढण्याचा प्रयत्न तेथील कर्मचाऱ्यांनी केला पण त्या भिकाऱ्यासारखा दिसणाऱ्या व्यक्तीने चक्क १२ लाख रुपये कॅश मोजून हर्ले डेव्हिडसनची बाईक खरेदी केली, तेव्हा मात्र तेथील कर्मचाऱ्याला खजील व्हावे लागले.

तो कुणी भिकारी असेल अशी समजूत झालेल्या कर्मचाऱ्याने त्याला रोखले पण हा माणूस दुकानात घुसला. मग त्याच्याकडे तेथील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आणि थोड्यावेळाने त्याला धक्का देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा मात्र या माणसाने मला मालकाला भेटायचे आहे असा आग्रह धरला आणि बाहेरचा गोंधळ ऐकून मालक बाहेर आला. त्याने त्याला एक बाईक विकत घ्यायची आहे असे सांगितले तेव्हा मालकाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकेना तेव्हा हर्ले डेव्हिडसनची बाईक दाखवून मालकाने किंमत सांगितली. लुंड डेचा या नावाच्या या माणसाने त्या बाईकसाठी १२ लाख कॅश दिले तेव्हा सर्व उपस्थित आश्चर्याने थक्क झाले.

मिळालेल्या माहितीनुसार लुंड प्रामाणिक, कष्टाळू मेकॅनिक असून त्याने कामातून अर्धवेळ निवृत्ती घेतली आहे. त्याला कोणतेही व्यसन नाही. आयुष्यात त्याने भरपूर काम करून साठविलेल्या पैशातून स्वप्नातली बाईक खरेदी करण्याचा विचार केला होता आणि त्याप्रमाणे त्याने खरेदी केली…