मन सुन्न करणारी घटना! भंडारा मध्ये नवजात शिशु केयर युनिटमध्ये आग; दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू…

1130

भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज मध्यरात्री दोनच्या सुमारा ही आग लागली. शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. या शिशु केअर युनिटमध्ये १७ बालकं होती. यापैकी ७ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बॉर्न युनिट मधून धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या रूम मध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले.

अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला.

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.