–सुरज पि.दहागावकर (उपसंपादक)
वरोरा: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून आता सरपंचपदाची निवड प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. ठिकठिकणी अनेक जण सरपंच होण्यासाठी देव पाण्यात टाकून चातकाप्रमाणे सोडतीकडे लक्ष ठेवून आहे. अश्यातच आज चंद्रपुर जिल्हात वरोरा तालुक्यातील महाडोळी गटग्रामपंचायत मध्ये वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी एका तरुणीची सरपंचपदी वर्णी लागली आहे.
वरोरा तालुक्यातील महाडोळी गटग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रतिभा शालीकराव मांडवकर यांची वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी बिनविरोध सरपंचपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे वरोरा तालुक्यातील सर्वात कमी वयाच्या सदस्य म्हणून त्यांनी महाडोळी गटग्रामपंचायत मध्ये ओबीसी महिला प्रवर्गातून निवडुन आल्या होत्या आणि आता त्यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडल्याने सर्वात तरुण सरपंच होण्याचा मान मांडवकर यांना मिळाला आहे.
मांडवकर या मूळच्या शेगाव या गावच्या असून त्यांचे आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन येथे बी.एस.सी द्वितीय वर्षाला शिक्षण सुरू आहे. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातुन बीए सुरू आहे. सरपंच पदी निवड झाली असली तरीही पुढे सुद्धा शिक्षण सुरू राहील असे त्यांनी इंडिया दस्तक न्यूज टीव्हीशी बोलतांना सांगितले.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील मांडवकर या जिद्दीच्या भरवश्यावर अपक्ष उमेदवार म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज केला होता. अपक्ष उमेदवार असतांना सुद्धा त्यांनी मजबूत पक्षांना, पॅनल ला पराजित करून विजयाची माळ आपल्या गळ्यात टाकली. एका सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलगी असलेल्या मांडवकर यांची सरपंच पदी निवड झाल्यामुळे सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
माझ्या मनात नेहमीच समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची इच्छा होती. त्यामुळे मी यावर्षी निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरला. निवडणुकीत सर्व मतदार बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले आणि आज माझी महाडोळी गट ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदी निवड झाल्यामुळे मी सर्व मतदाराचे आभार मानते. मी गावच्या विकासासाठी कटीबद्द असून सर्वोत्तपरी गावाचा विकास करणे हाच माझा हेतू आहे.
-प्रतिभा शालीकराव मांडवकर.
सरपंच महाडोळी ग्रामपंचायत