गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर यवतमाळपाठोपाठ अमरावतीतही लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झालाय. रविवारीपासून जिल्हा बंद ठेवण्यात येणार असून, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलीय. त्यामुळे अमरावती जिल्हात रविवारी लॉकडाऊनची घोषणा झालीय.
चार दिवसांपासून अमरावतीत कोरोना रुग्णांत वाढ
गेल्या चार दिवसांपासून अमरावतीत कोरोनाचे रुग्ण वाढत असून, 14 फेब्रुवारीला 435 रुग्ण सापडले असून, दोन जणांचा मृत्यू झालाय, तर 15 फेब्रुवारीला 439 रुग्ण सापडले असून, 4 जणांचा मृत्यू झालाय. तसेच 16 फेब्रुवारीला 495 रुग्ण सापडले असून, 17 फेब्रुवारीला 498 रुग्ण सापडलेत, तर 6 जणांचा मृत्यू झालाय.
अखेर अजित पवारांचा इशारा खरा ठरला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी मुंबई झालेल्या पत्रकारपरिषदेत यवतमाळसह आणखी दोन जिल्ह्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल, असा इशारा दिला होता. शिवसेना आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संजय राठोड, यशोमती ताई, बच्चू कडू यांच्याशी मी बोललो आहे. कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर झाली तर तिथे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे मी त्यांच्या कानावर घातले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले होते. अकोला, अमरावती, यवतमाळमध्ये लॉकडाऊन करण्याचे स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात आलेले असून, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना हे निर्देश देण्यात आले आहेत.
विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोल्याला कोरोनाचा विळखा
विदर्भात अकोल्यात 74, अमरावतीत 82, अमरावती मनपा क्षेत्रात 310, यवतमाळमध्ये 71 कोरोना रुग्ण आढळले आहेत. अकोला परिमंडळातच एकूण 662 रुग्ण आढळले आहेत. या तिन्ही जिल्ह्याती मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासन अॅलर्ट झालं आहे. गेल्या तीन ते चार महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाने डोकंवर काढलं आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली असून, त्यामुळे ही शहरं अॅलर्ट झालीत.