चंद्रपूर (प्रतिनिधी )-
पूर्व विदर्भातील झाडीपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा,गोंदिया,गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील साहित्यिक तसेच कलावंतांस झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर जिल्हा ग्रामीण विभागाचे वतीने दिले जाणारे राज्यस्तरीय झाडीबोली साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. आयोजन समिती आणि केंद्रीय निवड समितीकडे आलेल्या ग्रंथाचा विचार करण्यात येऊन सदर निवडप्राप्त साहित्यिकांच्या नावाची घोषणा करण्यात येत आहे.
यामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी उध्दवराव नारनवरे पुरस्कृत झाडीपट्टी नाट्य कलावंत पुरस्कारासाठी डाॕ.परशुराम खुणे गुरनोली (गडचिरोली )यांची निवड करण्यात आलेली आहे. दिवं. देविदास झगडकर स्मृती झाडीबोली काव्य पुरस्कारासाठी मुरलीधर खोटेले (ब्राम्हणी) यांच्या झाडीतला गाव या झाडीकाव्य संग्रहाची निवड करण्यात आली तर दिवं. सदाराम पारधी स्मृती उत्कृष्ट झाडीपट्टी चित्रकार पुरस्कारासाठी बंसी कोठेवार पळसगाव जाट (ता. सिंदेवाही) यांची निवड करण्यात आलेली आहे. डाॕ. अभिलाषा गावतुरे पुरस्कृत वैचारिक लेखन पुरस्कारासाठी अॕड.लखनसिंह कटरे बोरकन्हार (गोंदिया )यांच्या अवरूध्दलेल्या रूंद वाटा या विशेष ग्रंथाची निवड करण्यात आलेली आहे. तर जगन्नाथ गांवडे स्मृती कथालेखन पुरस्कारासाठी आनंदराव बावणे गुरूजी (पोंभुर्णा जि. चंद्रपूर ) यांच्या एक हिरा चंद्रपूरा या कथासंग्रहाची निवड करण्यात आलेली आहे. उपरोक्त सर्व पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, मानवस्त्र , आकर्षक सन्मानपत्र आणि ग्रामगीता असे असून पुरस्काराचे वितरण कोरोना काळ संपताच शासकीय नियमानुसार करण्यात येईल.
निवडप्राप्त साहित्यिक तथा कलावंताचे झाडीबोली साहित्य मंडळाचे संस्थापक डाॕ. हरिश्चंद्र बोरकर, निवड समितीचे प्रमुख ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , चंद्रपूर जिल्हाध्यक्ष कवी अरूण झगडकर , महिला जिल्हाप्रमुख प्राचार्य रत्नमाला भोयर, ॲड.सारिका जेनेकर ,सौ. अरूणा जांभूळकर आदींनी अभिनंदन केलेले आहे.