Homeचंद्रपूरहत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा; पालकमंत्र्यांनी केला शुभारंभ

हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा; पालकमंत्र्यांनी केला शुभारंभ

चंद्रपूर दि. 2 जुलै : हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरीता जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात दि. 1 जुलैपासून सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सिंदेवाही येथे आयोजित कार्यक्रमात आरोग्य कर्मचा-यांना गोळ्या देऊन केला. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सदर कर्मचा-याने गोळ्यांचे सेवन केले.

यावेळी सिदेंवाहीचे तालुका वैद्यकीय अधिक्षक डॉ. मानकर तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. सार्वत्रिक हत्तीरोग औषधोपचार मोहिमेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या डी.ई.सी. गोळ्यांचे काहीही दुष्परिणाम होत नाही. नागरिकांनी मनात कोणतीही शंका न बाळगता आरोग्य विभागामार्फत वाटप करण्यात येणाऱ्या डी.ई.सी. गोळ्यांचे सेवन करावे, असे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

या मोहिमेत आरोग्य विभागातील कर्मचारी नागरिकांना औषध खाण्यास प्रवृत्त करणार आहेत. हत्तीरोगाच्या प्रतिबंधाकरीता यावर्षी देखील हत्तीरोग विरोधी तीन प्रकारची औषधे नागरिकांना देण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये गरोदर माता, दोन वर्षाखालील बालके, अतिगंभीर रूग्ण वगळता सर्वांना घरोघरी जाऊन प्रत्यक्ष देखरेखीत औषध खाऊ घालण्यात येणार आहे.

त्यासोबतच, राज्यस्तरीय हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून पार पाडला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम शिंदे, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अधिष्ठाता डॉ.अविनाश टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हत्तीरोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम एक मिशन म्हणून जिल्हाभरात राबविण्यात यावी. तसेच आरोग्य विभागाने टीमवर्क म्हणून काम केल्यास हे मिशन यशस्वी करता येईल. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्हयांनी हा उपक्रम मोठया प्रमाणात राबवावा. नागरीकांनी गोळ्यांचे सेवन करून आरोग्य विभागाला हत्तीरोग दूरीकरण मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच जागतिक डॉक्टर दिनानिमित्त सर्व डॉक्टर व फ्रंटलाईन वर्कर यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी हत्तीरोग दूरीकरणासाठी डी.ई.सी. अलबेंडाझोल, आणि आयव्हर्मेक्टिन या गोळ्यांचे सेवन केले. तसेच उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांकडून हत्तीरोग दूरीकरणासाठी गोळ्यांचे सेवन करण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी हत्तीरोग निर्मूलनासाठी या गोळ्यांचे सेवन करावे व आरोग्य विभागाला हत्तीरोग निर्मूलनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!