नागपूर: तलाठी भरती मध्ये झालेल्या घोटाळ्यावरून विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार तरुणांच्या स्वप्नांना विकण्याचे काम करत असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
तलाठी परीक्षेत घोटाळेबाजांचे रॅकेट अजूनही सक्रियच आहे. आता थेट परीक्षा केंद्रात उत्तरे पुरवली जात असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजी नगरमधील चिकलठाण्यातील ईऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थीला आत उत्तरे पुरवण्याच्या तयारीत असलेला राजू भीमराव नागरे याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याने १० लाख रुपयात उत्तरे पुरवल्याची माहिती आहे. यावरून विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
*कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा?
विजय वडेट्टीवार म्हणाले, बेरोजगारीने होरपळत असलेले तरुण जीव तोडून नोकर भरतीची तयारी करतात. पण त्यांच्या स्वप्नांना लाखो रुपये घेऊन विकण्याच काम सरकार करत आहे. १० लाखात तलाठी पद विकले जात आहे. नोकरभरती मध्ये पण खोके पॅटर्न, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राज सरकारवर गंभीर अशा स्वरूपाची टीका केली आहे.
*या सर्वांचा कर्ता करविता कोण?
विजय वडेट्टीवार म्हणाले, वनरक्षक भरती नंतर आता तलाठी परीक्षेत देखील गैरप्रकार समोर येत आहेत. युवकांचे भविष्य आम्ही असे विकू देणार नाही. पदभरती मधील गैरप्रकारांचे उत्तर सरकारने द्यावे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी. याचा कर्ता करविता कोण आहे? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.