ब्रम्हपुरी -: आयुष्यात चढ उतार येतच असतात. संकट- अडचणी समोर उभ्या ठाकल्या की त्यांना धैर्याने तोंड देत सामोरे गेले पाहिजे. आयुष्यात काही वेळा काही प्रसंगातुन कितीही नैराश्य आलं तरी खचायच नाही. कारण आपण युवक आहोत. आता युवकांनी रडायचं नाही तर लढायच आहे. यश तुमच्या जीवनात चालून येईल फक्त प्रयत्नांची कास सोडू नका.असे प्रतिपादन पत्रकार राहुल मैंद यांनी केले.
ब्रम्हपूरी येथील नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालय व शांताबाई भैय्या महाविद्यालयाच्या वतीने चिंचोली येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
यावेळी मंचावर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रकाश वट्टी, डॉ. अभिमन्यू पवार, डॉ. नागभीडकर, प्रा. पांचाळ यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना राहुल मैंद म्हणाले की, तुम्हाला जर उत्तम वक्ता व्हायचं असेल तर तुम्हाला आधी उत्तम श्रोता बनाव लागेल. सोबतच सर्वांगिण ज्ञान वाचनातुन प्राप्त करावे लागेल. तेव्हा तुमचं लेखन कौशल्य देखील विकसित होईल. आणि प्रगल्भ युवा व्यक्तिमत्त्व म्हणून तुमची समाजात नवी छाप उमटेल. आजचे युग हे स्पर्धात्मक योग असल्याने वेळेची किंमत जाणारच यशाचे शिखर गाठतो आहे. अशा स्पर्धात्मक युगात टिकायची असेल तर प्रत्येक युवकाने अंगी जिद्द चिकाटी व प्रयत्नशीलता यांची सांगड घालून प्रबळ आत्मविश्वासाने जगातील अडचणींना समर्थपणे तोंड देणे हेतू सज्ज असावे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. चैतन्या राऊत यांनी सूत्रसंचालन कु.पुनम नागोसे यांनी तर आभार ओम नैताम यांनी मानले.