सावली – पांढरसराड येथील तलावाचे गेट व नहर नादुरुस्त असल्याने शेती सिंचनापासून वंचित राहण्याची पाळी येत असल्याने दुरुस्ती करण्यासाठी माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात लाभधारक शेतकऱ्यांनी जलसंधारण विभागाला निवेदन दिले. तात्काळ काम न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सावली तालुक्यातील पांढरसराड येथे गट नंबर 540, 541 हा जिल्हा परिषद अंतर्गत जलसंधारण विभागाचा तलाव आहे. तलावाचे जलसिंचन क्षेत्र जास्त असून या तलावातून शेकडो हेक्टरला सिंचन होते. मात्र दुरुस्ती अभावी शेतकरी दरवर्षी स्वतः नहर दुरुस्ती करून पिकास पाणी देतात. मागील वर्षी अनेक ठिकाणी भगदाड पडल्याने शेतकऱ्यांनी टीन, पोते लावून कसे बसे पिक काढले आहे. मात्र यावर्षी गेट व नहराचे काम न झाल्यास पिक काढणे अडचणीचे होणार आहे. त्यामुळे तातडीने बांधकाम करण्याची मागणी शेतकऱ्यांनी जलसंधारण उपविभाग मुल यांचेकडे केली आहे. काम न झाल्यास शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. माजी सभापती विजय कोरेवार यांचेसह तुषार मेश्राम, आकाश मेश्राम, धनराज गेडाम, साईनाथ अलाम, नलिंद्र गावडे, विवेक गावडे, युवराज गेडाम, राजेंद्र अलाम, अमोल सिडाम, प्रल्हाद मडावी उपस्थित होते.