Homeचंद्रपूरयशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे सत्कार सोहळे

यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे सत्कार सोहळे

-सुरज पी. दहागावकर,                                                    -मुख्य संपादक, इंडिया दस्तक न्युज टिव्ही

बारावीचा निकाल लागला. चांगल्या गुणांनी बरीच पोरं उत्तीर्ण झालीत. आता पुढचे आठ-दहा दिवस जिकडे तिकडे सत्काराचे सोहळे आयोजित केल्या जातील. वर्षभर कधीही आणि कुठेही सामाजिक कार्यात न दिसणारी मंडळीही शंभर-दोनशे रुपयांचे शिल्ड, मेडल देऊन पोरांचे सत्कार करतील. अशा सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला स्वतःच्या आयुष्यात स्वतःला सिद्ध न करू शकलेल्या मात्र सोशल मीडियातून प्रसिद्ध झालेल्या व्यक्तीला करियर मार्गदर्शन, 12 वी नंतर पुढे काय? अशा गंभीर विषयावर हजारो रुपये देऊन मार्गदर्शन करण्यासाठी बोलवतील. त्यातून स्वतःच्या संस्थेची, मंडळाची स्तुती करून घेतील. मात्र ही मंडळी कधीही एखाद्या गरजू पोरांच्या मदतीला धावून येताना दिसत नाही. त्यांना मदत करताना दिसत नाही.

हल्ली शिक्षणाला आपण धंदा बनवला आहे. त्यामुळे निकालानंतर होणारे सत्कार सोहळे हे मला मार्केटिंगचे नवे फंडे वाटतात. कारण अशा सोहळ्यात पोरांना मार्गदर्शन कमी आणि स्वतःच्या संस्थेची स्तुती अधिक असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे शंभर-दोनशे रुपयांचे शिल्ड शेकडो पोरांना वाटण्यापेक्षा दहा-पंधरा हजार रुपयांची मदत दोन-चार गरजू आणि होतकरू विद्यार्थ्याना करता येईल का याचा विचार केला पाहिजे. जेणेकरून त्यांची भविष्याची शैक्षणिक वाटचाल चांगली होईल. कारण समाजातील बरेच असे विद्यार्थी आहेत जे अभ्यासात प्रचंड हुशार आहेत मात्र आर्थिक परिस्थितीमुळे पुढील चांगले उच्चशिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे.

आज समाजात नाते आपुलकीचे सारख्या हातावर मोजता येईल इतक्याच संस्था विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निःस्वार्थी मनाने काम करीत आहेत. मात्र शेकडो संस्था फक्त चमकोगिरी करतांना दिसतात. त्यामुळे निकालानंतर होणाऱ्या सत्कार सोहळ्याचे रूपांतर हे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर मदत सोहळ्यात होणे आवश्यक आहे. कारण यशस्वी झाल्यावर पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या शेकडो हातांपेक्षा, संकट काळात मदतीला धावून जाणारा मदतीचा एक हात हा सर्वश्रेष्ठ ठरत असतो. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना शोधले पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. कारण परीक्षेत चांगल्या गुणांनी पास होणारे बहुसंख्य विद्यार्थी हे चांगल्या घरातून आलेले असतात. मात्र हातावर मोजता येतील इतके विद्यार्थीच हे गरीब कुटुंबातून आलेले असतात.

खरंतर हल्ली परीक्षेतील गुण बघून पोरांची बुद्धिमत्ता ठरविली जाते. चांगले गुण मिळाले की कौतुक करायचे आणि गुण कमी मिळाले की वाईट बोलायचे अशी आपल्या समाजाची मानसिकता झाली आहे. कधीतरी ५०-६० टक्के असे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्याचे सत्कार सोहळे आयोजित करून बघा. त्यांच्या संघर्षाची कहाणी ऐकून बघा. तेव्हा कळेल त्या पोरांनी कोणत्या संकटातून मार्ग काढून हे यश संपादन केले आहे. पण नाही; असे सत्कार सोहळे उभ्या आयुष्यात कधीही आयोजित होणार नाही. कारण आपला समाज हा फक्त यशाला सलाम करतो मात्र संघर्षाला कधीच बघत नाही. त्यामुळे आपली कितीतरी पोरं ही प्रचंड क्षमता असतांना सुद्धा बऱ्याचदा आयुष्यामध्ये पुढे जात नाही.

आजूबाजूच्या निरिक्षणातून एक बाब पुन्हा प्रकर्षाने दिसून येते. ती म्हणजे विद्यार्थांना मिळणारा फुकटचा सल्ला. न मागता, न विचारता फुकटचा सल्ला देणाऱ्यांची संख्या हल्ली प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तू हे कर, तू ते कर, तू अमुक-अमुक क्षेत्रात जा तिथे नोकरीच्या चांगल्या संधी आहे. पण हे सर्व सांगताना असा एकही माणूस शोधूनही सापडत नाही की, तू या क्षेत्रात जा, तिथे चांगल्या संधी आहेत. त्यासाठी आवश्यक तेवढी आर्थिक मदत मी करेल. कारण एखाद्याला फुकटचा सल्ला देणे फार सोपे असते मात्र दोन पैश्याची मदत करणे तेवढेच कठीण. त्यामुळे एखाद्याला फुकटचे सल्ले देण्यापेक्षा आपल्या ऐपतीप्रमाणे मदतीचा हात पुढे केला पाहिजे. कारण अनेक विद्यार्थ्यांना फुकटच्या सल्ल्यापेक्षा, सत्कारापेक्षा आर्थिक मदतीची अधिक गरज असते.

आपण सर्वांनी यावर नक्की विचार करावा एवढीच अपेक्षा…

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!