शरद कुकुडकार (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)
चंद्रपूर :- गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील विशाल मोहुर्ले यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. यात विशालचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. करिता त्याच्या कुटुंबियांना वनविभागाच्या नियमानुसार वन्य प्राण्यांच्या हल्यामुळे मृत पावल्यास 20 लाख रुपये आर्थिक सहाय्य मंजूर करावे अशी मागणी मृतक विशाल मोहुर्ले च्या कुटुंबियांनी केली आहे.
दिनांक 31 मे 2024 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास गोजोली येथील 36 वर्षीय विशाल भारत मोहुर्ले गोंडपिपरी वरून गोजोली जात असताना अचानकपणे रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यामुळे विशालचा उपचारादरम्यान नागपूरला मृत्यू झाला. विशाल हा एकमेव घरचा कमवता व्यक्ती होता व त्याच्या पश्चात त्याच्या परिवारात आई-वडील पत्नी व चार महिन्याची मुलगी आहे.
वन विभागातील वनपाल यांनी खोटे साक्षदार उभे करून नियमांचा उल्लंघन करीत पंचनामा केला आहे. वनविभागाच्या या भोंगळ कारभाराचा आम्ही जाहीर निषेध करतो. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार वन प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीच्या परिवाराला वीस लक्ष रुपये देणे बंधनकारक आहे. आमची अशी रास्त मागणी आहे की मोहुर्ले परिवाराला वन विभागातर्फे वीस लक्ष रुपये देण्यात यावे. विशालच्या चार महिन्याच्या बाळाच्या भविष्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याकरिता या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. आमची रास्त मागणी मान्य न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा ईशारा मृतक विशाल च्या कुटुंबियांनी व्ही सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी दिला आहे.