राजुरा, दि. २१
राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा व कोरपना तालुक्यातून जाणाऱ्या राजुरा-बामणी-लक्कडकोट (एन.एच. 930D) आणि राजुरा-आदिलाबाद (एन.एच. 353B) या दोन्हीही महामार्गावरील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला तात्काळ निर्देश देण्याची मागणी भाजपाचे राजुरा विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
महाराष्ट्र व तेलंगाणा या दोन राज्यांना जोडणारा राजुरा-बामणी-लक्कडकोट (एन.एच. 930D) तसेच राजुरा-आदिलाबाद (एन.एच. 353B) या दोन्हीही राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रस्त्यांच्या कामांची उंची जवळपास ५ ते ७ फूट वाढवण्यात येत आहे; परंतू पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे हे पाणी लगतच्या शेतशिवारात शिरून शेतपिकांचे प्रचंड नुकसान होण्याचा धोका संभवतो. अशाच ढिसाळ नियोजनामुळे गतवर्षी कोरपना तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीनी पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
त्यामुळे यावर्षी पुन्हा तशी परिस्थिती उद्भवू नये. आणि शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याचे पाप घडू नये, यासाठी विधानसभा क्षेत्रातील राजुरा व कोरपना तालुक्यातून जाणाऱ्या राजुरा-बामणी-लक्कडकोट (एन.एच. 930D) आणि राजुरा-आदिलाबाद (एन.एच. 353B) या दोन्हीही राष्ट्रीय महामार्गावरील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने संबंधीत विभागाला व कंत्राटदाराला तात्काळ निर्देश द्यावे, अशी मागणी भाजपाचे राजुरा विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.