Homeचंद्रपूरविशालगडाच्या मुक्तीसाठी न्यायालयात यशस्वी लढाई लढू : सुधीर मुनगंटीवार

विशालगडाच्या मुक्तीसाठी न्यायालयात यशस्वी लढाई लढू : सुधीर मुनगंटीवार

छत्रपती शिवाजीमहाराज या नावातच इतकी ऊर्जा आणि शक्ती आहे कि रयतेच्या हितासाठी एकदा केलेला संकल्प पूर्ण होतोच, हा माझा अनुभव आहे; त्यामुळेच प्रतापगडच्या पायथ्याशी असलेले अतिक्रमण काढले, महाराजांच्या दरबारात जी इच्छा मावळ्यानी मनात बाळगली ती पूर्ण होतेच. रायगडावर आलेल्या विशालगडप्रेमी मावळ्यांना हे सरकार निराश होऊ देणार नाही, विशालगडाच्या मुक्तीसाठी न्यायालयात यशस्वी लढाई लढू अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी हजारो शिवाभक्तांना आज दिली.धो-धो पावसात हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या दिमाखदार शिववराज्याभिषेक सोहळ्यात “विशालगड मुक्तीच्या” घोषणा सुरु असताना ना. मुनगंटीवार यांच्या धडाकेबाज भाषणाने आणि आश्वस्थ शब्दांनी परिसर दुमदूमून गेला.

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात तिथीनुसार आज छत्रपती शिवरायांचा 351 वा राज्याभिषेक सोहळा प्रचंड पाऊस आणि धुक्याचे वातावरण असतानाही अत्यंत शिस्तीत आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारे हजारो धारकरी “जय भवानी, जय शिवराय” च्या घोषणा देत असतानाच सुस्पष्ट मंत्रोच्चारात, पवित्र वातावरणात शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा आनंद “याची देही, याची डोळा” हजारो शिवभक्त घेत होते. राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार, पालकमंत्री उदय सामंत, मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे,आमदार अनिकेत तटकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, केवळ खुर्चीसाठी मोह म्हणून सत्तेत बसलेले हे सरकार नसून छत्रपती शिवरायांची आन बाण आणि शान राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात खऱ्या अर्थाने रयतेचे कल्याण करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले राज्य चालविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिवरायांचे कर्तुत्व आणि विचार हेच आमचे आदर्श असून मतांसाठी लांगुलचालन पत्करणाऱ्यांपैकी आम्ही नाही.छत्रपती शिवरायांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले याचे मला मनापासून समाधान आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफजलखानाच्या कबरी भोवतीचे अतिक्रमण काढण्यात याच सरकारला यश आले याचा मनापासून आनंद होतो. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत, त्यांचा विचार आणि कर्तृत्व जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा कर्तुत्ववान नेता महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला याचा शिवप्रेमिना आनंद आहे, आणि याच आनंदाच्या उर्जेवर आम्ही आमचा संकल्प पूर्ण करणार आहोत असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

ना सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणाला सुरुवात होताच, त्यांच्या प्रत्येक वाक्यावर शिवप्रेमींनी टाळ्या देत, शिवरायांचा जयजयकार करीत सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ना सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, “सुधीर भाऊ आगे बढो, मी तुमच्या सोबत आहे ” अशी ग्वाही दिली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कमी बोलतो आणि काम अधिक वेगाने करतो, विशाळगडाचा प्रश्न असो की आणखी कुठला तो वेगाने मार्गी लागेल अशी ग्वाही देतो. छत्रपती शिवरायांचा धनुष्यबाण हातात असलेला जगातील पहिला पुतळा उमरखिंडी येथे उभारण्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.. रायगडाच्या पायथ्याशी निर्माण होत असलेल्या शिवसृष्टीला निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढाकारामुळे 350 व्या शिवराज्यभिषेक सोहळ्यात वर्षभर अनेक उपक्रम राबविण्यात आले असे त्यांनी आवर्जून सांगितले.

किल्ले रायगड दुमदुमले
पावसाच्या अखंड जलधारात शिवप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आज शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. सोहळात विविध व्याख्यात्यांनी शिवपराक्रमाच्या सादर केलेल्या व्याख्यानांनी वातावरण भारून टाकले होते. सोहळा मंत्रोच्चारात पालखीतून मिरवणुकीने राजसदरेवर आगमन झाले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला.नंतर शासकीय मानवंदना देण्यात आली. ढोल -ताशे,शिवप्रेमी पथकांचे विविध कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमले होते.

लोककलांचे सादरीकरण
रायगडावर होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, समाधी स्थळ व राजसदर येथे सुंदर सजावट करण्यात आली होती. पारंपरिक वेशभूषा, लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण उत्साहाचे होते.

श्री शिवराज्याभिषेक महोत्सव सेवा समिती, संलग्न संघटनांचा सहभाग
या सोहळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाने पोलीस, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम ,सार्वजनिक आरोग्य विभाग, एस टी महामंडळ, महावितरण विविध शासकीय विभाग यांचे सहाय्याने आरोग्य, पाणी, वाहतूक, पार्किंग सुविधा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आल्या होत्या. श्री शिवराज्याभिषेक महोत्सव सेवा समिती,दुर्गराज किल्ले रायगडावर सलग्न संघटनांचा आयोजनात सहभाग होता.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!