शरद कुकुडकार
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
गोंडपिपरी:- पाऊस पडल्याने जिल्ह्यातील शेतकर्यांनी सुरुवातीच्या पावसावर केलेली पेरणी वाया जाण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी तर शेतकर्यांचे पीक मोडले असून, आता त्यांच्यासमोर दुबार पेरणीसाठी पैशांची जमवाजमव कशी करायची असा प्रश्न उभा ठाकला आहे. दुसरीकडे काही ठिकाणी ही पिके जगविण्याची धडपड सुरू आहे. मात्र, आणखी चार ते पाच दिवस पाऊस न आल्यास ही धडपडही व्यर्थ ठरणार आहे. बहुतांश शिवारांमध्ये खरीपपूर्व मशागत केव्हाच आटोपली असून, शेतकरी पेरणीसाठी पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत आहेत.
परिसरात पावसाच्या अनियमिततेचा खेळ सुरू आहे. ढगांची गर्दी, पण शिडकाव्यापलीकडे पाऊस नाही. त्यामुळे पाऊस येईल या आशेवर पेरणी करणारे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ज्यांनी जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात पेरणी केली त्यांच्यावर तर पीक मोडण्याची वेळ आली आहे. गोंडपिपरी बहुतांश भागात अशीच स्थिती आहे.
हवामान विभाग व पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार 1 जूनपासून महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होईल, असे वेळोवेळी सांगण्यात आले. वेळेवर मजूर मिळणार नाही म्हणून गोंडपिपरी तालुक्यातील यातील अडेगांव, चेकदरूर, दरूर, पारगांव, धामणगांव, सुपगांव, नदंवर्धन, पानोरा, सालेझरी,शिवणी देशपांडे, राळापेठ, शिवारात बारा जूनच्या आतच कपाशी व तूर आणि मिरची रोप टाकून लागवड करण्यात आली. अजूनही काही ठिकाणी पेरणीची कामे सुरू आहेत.
अडेगांवसह परिसरात पेरलेली कपाशी मोडण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात आभाळ काळ्या ढगांनी भरून आले होते. पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यामुळे दोन-तीन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडेल या आशेवर अनेक शेतकर्यांनी धूळपेरणी केली होती. मात्र पाऊस हुलकावणी देऊ लागल्याने अनेक शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. महागडे बी- बियाणे परत खरेदी करावे लागत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. शिवाय मोठ्या कष्टाने उन्हाळ्यात जोपासलेली पिके पावसाअभावी जून महिन्यात जळण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच कपाशी पिकाचे अंकुरही जळण्याच्या मार्गावर आहेत.