ज्ञानातुन मिळणारे सामर्थ्य हे चिरकाल टिकते. मिळालेले हे सामर्थ्य अंगिकारून समाजातील प्रत्येक यशस्वी व्यक्ती व विद्यार्थी यांनी संघर्षातुनच उज्ज्वल भविष्य घडविल्याचा इतिहास आहे. यशाचे शिखर गाठण्यासाठी परिस्थिती नाही तर उत्तम मनस्थिती, दृढ आत्मविश्वास, प्रगल्भ इच्छाशक्ती यांची नितांत गरज आहे. आपणा सर्व होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी मी सदैव खंबीरपणे उभे असुन संघर्षाच्या काटेरी वाटेतुनच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या यशाचा मार्ग सुकर करावा असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
ते ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित ब्रम्हपूरी मतदारसंघातील ब्रम्हपूरी, सावली , सिंदेवाही येथील १०वी व १२वी च्या परिक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार डॉ. नामदेव किरसान, प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव येथील दिपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन, मोटीव्हेशनल स्पीकर सचिन बुरघाटे हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार अभिजीत वंजारी, काॅंग्रेस नेते देविदास जगनाडे, ने.ही. महाविद्यालय माजी प्राचार्य डॉ नामदेव कोकोडे, अॅड गोविंदराव भेंडारकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हितेंद्र राऊत, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, न.प.माजी सभापती विलास विखार, माजी नगरसेवक डॉ नितीन उराडे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, काॅंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मोंटु पिलारे, सिंदेवाही तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे ,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, धनराज मुंगले, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आज स्पर्धेचे युग आहे. सर्व क्षेत्रात प्रचंड स्पर्धा सुरू आहे. अशा कठीण परिस्थितीत देशाची भावी पीढी यांनी मनाने व आत्मविश्वासाने खचुन न जाता ज्ञानाची भुक वाढवून आपली विद्वत्ता व आत्मविश्वासाच्या बळावर लक्ष गाठेपर्यंत कुठेही न थांबता प्रयत्नांची पराकाष्ठा करून संघर्ष करावा. तरच यश तुमच्या पदरी पडेल. याप्रसंगी त्यांनी शिक्षणकाळात बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले मात्र भविष्यकाळात आयपीएस अधिकारी म्हणून यश मिळवणारे मनोजकुमार शर्मा यांच्या जिवनप्रवासावर आधारित १२ वी फेल या चित्रपटातील प्रेरणादायी उदाहरण देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
यानंतर पदवीधर शिक्षक आमदार अभिजीत वंजारी यांनी देशातील वाढती बेरोजगारी, बदलती शिक्षणप्रणाली, पालक व शाळा व्यवस्थापन यांतील संभ्रम व शिक्षणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. तर गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ नामदेव किरसान यांनी आपल्या अभ्यासु शैलीतुन शिक्षणातुन चांगले विद्यार्थी व नागरिक कसे होता येईल व देशसेवेसाठी पुढाकार घेऊन सोबतच आपले भविष्य घडविणे कसे शक्य आहे यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही ,सावली व ब्रह्मपुरी येथील इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा तसेच पालक व शिक्षक तथा मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ब्रह्मपुरी सावली व सिंदेवाही तालुक्यातील विद्यार्थी पालक शिक्षक व मुख्याध्यापक प्रामुख्याने बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश डांगे, सुरज मेश्राम यांनी प्रास्ताविक डॉ राजेश कांबळे तर आभार ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके यांनी मानले.