HomeBreaking Newsनिवडणुका, दिखाऊ समाजसेवा आणि निवडणुकीचा प्रचार

निवडणुका, दिखाऊ समाजसेवा आणि निवडणुकीचा प्रचार

-सुरज पी. दहागावकर (मुख्य संपादक)

देशात लोकसभा निवडणुका संपल्या. नवे सरकार आले आणि आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका येत्या दोन-तीन महिन्यात होणार आहेत. पण या निवडणुकीमध्ये नगरपरिषद, महानगरपालिकेचा साधे नगरसेवक म्हणून निवडणूक येण्याची शाश्वती नसणारे अनेक महाशय थेट विधानसभा लढण्याच्या तयारीत दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या तोंडावर, आपल्याला समाजकार्यात गुंतलेल्या अनेक नेत्यांची संख्या वाढलेली दिसत आहे. हे नेते अचानक समाजकार्याच्या क्षेत्रात सक्रिय झालेले आहेत. गेले चार-साडे चार वर्ष गायब झालेले नेते निवडणुका जवळ बघून मोर्चे, आंदोलन, शिबिर, सामाजिक कार्यक्रमात हजेरी लावत आहेत. एवढंच कशाला तर पोस्टरबाजी करून लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण त्यांची अचानक समाजसेवेतील सक्रियता बघून आपण आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून विचार करावा की, हे नेते खरे समाजसेवक आहेत की निवडणुकीसाठी तयार होणारे धुरंधर?

समाजकार्य म्हणजे फक्त निवडणुकीच्या काळात लोकांसमोर येणे नाही. खरे समाजकार्य म्हणजे दीर्घकालीन, टिकाऊ आणि प्रभावी कार्य असावे लागते. समाजातील गरीब, दुर्बल आणि गरजू लोकांसाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आणि त्यांच्या समस्यांचे समाधान करणे हे महत्त्वाचे आहे. निवडणुकीच्या काळात समाजसेवेचा दिखावा करणे म्हणजे केवळ जनमत मिळवण्याचा प्रयत्न असतो. आपण सर्वांनी बघितले पाहिजे की, हल्ली समाज माध्यमांवर हवा करणाऱ्या नेत्यांनी किती वेळा समाजातील गरजू लोकांच्या मदतीसाठी तातडीची उपाययोजना केली आहे. समाजासाठी स्वतःला वाहून घेतलेले आहे. कारण निवडणुकीच्या काळामध्येच समाजकार्य, भेटी गाठी, सामाजिक कार्यक्रमात हजेरी, शिबिरे घेणे, मोफत वस्तू वाटप करणे, मोर्चे, आंदोलन करणे, स्वतःची प्रसिध्दी करून घेणे हे सर्वकाही एकाच क्षणी दाखवले जाते, त्यामुळे हवा करणाऱ्या नेत्यांचे वास्तविक कार्य कसे आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

मीडिया सध्या समाजाच्या विचारसरणीवर प्रभाव टाकण्याचे एक महत्त्वाचे आणि प्रभावी साधन आहे. कारण मीडियाच्या माध्यमातुन एका क्षणात लाखो लोकांपर्यत सहजपणे पोहचता येते. त्यामुळे आजकाल अनेक नेते आपल्या कार्याची प्रसिद्धी, स्तुती करून घेण्यासाठी मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करत करतात. हे नेते आपल्या कामाचा गाजावाजा करण्यासाठी वृत्तपत्रांना पैसे देतात, जाहिराती देतात आणि बातम्या पसरवतात. यामुळे त्यांच्या कार्याचा प्रभाव वाढवला जातो, पण यामागे किती वास्तविकता आहे हे तपासणे आवश्यक आहे. कारण मीडियाद्वारे प्रचार केल्याने नेत्यांचे कार्य मोठे आणि प्रभावी दिसते, पण हे सर्व फक्त प्रचाराचे साधन असू शकते. कारण अनेकजण पोडतिडकीने गेल्या अनेक वर्षापासून सतत समाजासाठी प्रत्यक्षात काम करत आहेत पण त्यांच्या बातम्या कधीच वृत्तपत्रांत, टिव्ही मध्ये दिसत नाही. परंतु याउलट जाहिराती, पैसे देऊन समाजासाठी मूठभर काम करून गावभर प्रसिध्दी करून घेणारे अनेक महाशय याच निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला दिसून येतात.

आपल्या समाजामध्ये जात आणि धर्माच्या नावावर राजकारण करणारे अनेक राजकीय नेते आहेत. हे नेते आपआपल्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. मी अमुक-अमुक समाजाचा नेता म्हणून स्वतःला मिरवत असतात. यातील अनेक नेते वेळोवेळी असे काही दाखवित असतात की, त्यांच्याशिवाय त्या समाजाचे कल्याण होऊच शकत नाही. तेच समाजाचे खरे नेते आहेत. पण मुळात हा सुद्धा एक निवडणुकीचा फंडा असू शकतो हे नाकारता येत नाही. कारण समाज फक्त निवडणुका जवळ बघून कसा काय आठवतो हा एक न सुटणारा प्रश्न आहे. त्यामुळे जाती धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या नेत्यांना घरी बसविले पाहिजे. अनेकजण माझ्या पाठीमागे माझा अख्खा समाज आहे त्यामुळे निवडणुकीची उमेदवारी मलाच द्यावी यासाठी सामाजिक दबाव टाकण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. पण हल्ली सामान्य जनता फार हुशार झालेली आहे. कारण सामान्य जनता अशा स्वयंघोषित नेत्यांच्या प्रचारावर, बोलण्यावर विश्वास न ठेवता आपल्या विवेकाच्या आधारावर लोकप्रतिनिधी निवडून देतात.

निवडणुकांच्या काळात आपल्या मताचा विवेकपूर्वक वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फक्त नेत्यांनी दिलेल्या आश्वासनामध्ये, वचनांमध्ये आणि प्रचारात अडकून न पडता, नेत्यांच्या कार्याची सत्यता तपासूनच मतदान केले पाहिजे. कारण योग्य नेतृत्व समाजाचे परिवर्तन घडवण्यासाठी आवश्यक आहे. आपल्या मताचा वापर समाजाच्या हितासाठी आणि विकासासाठी केला पाहिजे. कारण निवडणुकीचा काळ फक्त प्रचाराचा किंवा जाहिरातींचा नाही, तर समाजातील खरे बदल घडविण्याचा आहे. आपण सर्वांनी येत्या निवडणुकीमध्ये मतदान करतांना आपल्या नेत्यांचे खरे कार्य तपासले पाहिजे. कारण फुकटाच्या भाषणांपेक्षा, प्रत्यक्ष कार्य आणि सामाजिक योगदान अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे, स्वार्थी नेत्यांकडून सावध राहून, समाजाच्या हितासाठी योग्य निर्णय घेऊन सकारात्मक परिवर्तनाच्या दिशेने एक योग्य पाऊल आपण सर्वांनी मिळून टाकले पाहिजे.

-सुरज पी. दहागावकर
  मुख्य संपादक- इंडिया दस्तक न्युज टीव्ही

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!