गेल्या दहा वर्षांपासून ब्रम्हपूरी मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून येथील लोकप्रतीनीधीत्वाची सुत्रे हाती दिली. या आशिर्वादाने मिळालेल्या बळाच्या जोरावर जनमताच्या विश्वासाला तडा न जाऊ देता कोट्यावधींचा विकास नीधी खेचुन आणुन मतदारसंघाचा विकास केला. भविष्यात येथे औद्योगिकरणातुन प्रगती साधून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार तसेच विकसित ब्रम्हपूरीला जिल्हा बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार अशी ग्वाही महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते ब्रम्हपूरी विधानसभा निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ब्रम्हपूरी मतदारसंघातील प्रत्येक गावात भौतिक सुविधा, दळणवळणासाठी पक्के रस्ते, प्रशस्त ग्राम पंचायत भवन, अंगणवाड्या , शुध्द पेयजल पाणी पुरवठा योजना, सामजिक सभागृह, वाचनालये याकरिता कोट्यावधींचा विकास निधी खेचून आणला. तर शहरी भागात ई -लायब्ररी, जलतरण तलाव, डास मुक्तीसाठी भूमिगत गटार, शासकीय कार्यालयासाठी प्रशस्त इमारती, वाहतूक सिग्नल, क्रीडांगण यासाठी देखील मुबलक असा विकास निधी उपलब्ध करून दिला. हा विकास साधताना मी कुठल्याही जाती धर्मामध्ये भेदभाव केला नाही. तद्वतच देशातली महाभ्रष्ट महायुती सरकारने देशातली शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बड्या उद्योगपतींचे 16 लक्ष कोटी कर्ज माफ केले. तसेच येथील उद्योग गुजरातला पळवून तरुणांना बेरोजगार करण्याचे महापाप केले.अशा शेतकरी,शेतमजूर,कामगार, सामान्य जनता विरोधी सरकार कडून काय अपेक्षा करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
येत्या काही दिवसांत राज्यात महाविकास आघाडीचे येणार असुन आमच्या वचन नाम्यानुसार महिलांना प्रतिमाह ३ हजार,शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत कर्जमाफी व नियमित कर्ज फेडीसाठी ५० हजार प्रोत्साहन निधी, बेरोजगार तरुणांना प्रतिमाह ४ हजार, प्रत्येक कुटुंबाला आरोग्य विमा अंतर्गत, मोफत औषधे व २५ लाखांचा विमा लाभ देण्यात येणार आहे. आपण सर्वजण लोकसभे प्रमाणे एकजुटीने, एकसंघ होऊन देश व राज्य वाचविण्यासाठी आमच्या लढाईत सहभागी होऊन महाविकास आघाडीला बहुमत देऊन विजयी करा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितांना केले. आयोजित प्रचार कार्यालय उद्घाटनाप्रसंगी प्रामुख्याने विमुक्त जाती भटक्या जमाती सेल प्रदेशाध्यक्ष पल्लवी रेनके,काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.देविदास जगनाडे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते दामोधर मिसार, अॅड मनोहर उरकुडे, कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे, काॅंग्रेस ओबीसी सेलचे राष्ट्रीय समन्वयक अॅड.गोविंद भेंडारकर, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी नगराध्यक्षा वनिता ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वासु सोंदरकर, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जि.प. सदस्य डॉ.राजेश कांबळे, रिपाई गवई गटाचे नेते विजय रामटेके, एकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलींद भन्नारे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष इक्बाल जेसानी, इनायत पठाण, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, योगेश मिसार यांसह महाविकास आघाडी व घटक पक्षातील सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.