वरोराः- दि. ११ – मराठवाडा इतिहास परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन दि. ९ डिसें. २०२४ ते ११ डिसें. २०२४ रोजी मराठवाडा इतिहास परिषद व आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवनात नुकतेच संपन्न झाले.
दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी इतिहास परिषदेचे उद्घाटन समारंभ संपन्न झाले. उद्घाटक डॉ. विकास आमटे सचिव, महारोगी सेवा समिती आनंदवन, प्रमुख अतिथी डॉ. प्रशांत बोकारे मा. कुलगुरु गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, बीजभाषक प्रा. डॉ. संतोष बनसोड विभाग प्रमुख, इतिहास विभाग नारायणराव राणा, कॉलेज बडनेरा, संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन संगाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, अध्यक्ष, मा. डॉ. मृणाल काळे प्राचार्य, आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य सोमनाथ रोडे, लातूर, डॉ नारायण सूर्यवंशी, अध्यक्ष, मराठवाडा इतिहास परिषद, छ. संभाजीनगर व डॉ. अरविंद ढोके इतिहास परिषद समन्वयक, आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला.
परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. विकासभाऊ आमटे, सचिव महारोगी सेवा समिती आनंदवन, असे म्हणाले की महारोगी सेवा समितीच्या स्थापनेला या वर्षी ७५ वर्ष पूर्ण होत आहे. अमृतमहोत्सवी वर्षात ४४ वी मराठवाडा इतिहास परिषद आनंदवनात संपन्न होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. श्रद्धेय बाबांनी समाजसेवी संस्थेच्या लावलेल्या रोपटयाचे वटवृक्षात रुपांतर होत असताना ही परिषद इथे होत आहे याचा मनोमन आनंद आम्हा सर्वांना होत आहे. कुष्ठरोगी, अंध, अपंग मुकबधिर यांची सेवा संस्थेच्या स्थापनेपासून आजपावेतो चालू आहे. त्याचा इतिहास संशोधकांनी मांडावा आणि इथून प्रेरणा घेऊन आपलाही खारीचा वाटा असावा असे कार्य करावे ही अपेक्षा भाऊंनी याप्रसंगी व्यक्त केली.
डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरु गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली या प्रसंगी म्हणाले, स्वकथनापेक्षा सत्यकथन करुन येणाऱ्या पिढीपुढे खरा इतिहास मांडावा समृद्ध भारताचा इतिहास जगापुढे यावा हे आव्हान या परिषदेने स्विकारावे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
बीजभाषक डॉ. संतोष बनसोड म्हणाले, बाबांचे काम हे मानवाच्या उत्थानासाठी होते या देशाला समाजसेवकांचा, क्रांतिकारकांचा, शुरांचा वारसा आहे. तो वस्तुनिष्ठपणे लिहिला जावा आधुनिक इतिहास लिहिताना शेतकरी, कष्टकरी, मानवाधिकार, भ्रष्टाचार, बेकारी, महागाई लोकशाही राजकारण समाजकारण यावर निर्भीडपणे लेखकाने साध्य केले पाहीजे असे परखड भाष्य या प्रसंगी त्यांनी व्यक्त केले.
डॉ. सूर्यवंशी, अध्यक्ष मराठवाडा इतिहास परिषद यांनी इतिहास परिषदेची भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर मराठवाडा इतिहास परिषद नवोदित संशोधकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असून या माध्यमातून दुर्लक्षित इतिहास जगासमोर येत आहे हे मराठवाडा इतिहास परिषदेचे यश म्हणावे लागेल असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. मृणाल काळे प्राचार्य आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन, वरोरा म्हणाले,“देश बदलला पाहिजे असे प्रत्येकाला वाटते पण त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करायला हवी त्यासाठी मी देशासाठी काय करू शकतो हा विचार करा सुरुवात करा एक दिवस देश बदलेल.” उपस्थितांचे आभार डॉ. अरविंद ढोके यांनी मानले तर सू़त्रसंचालन प्रा. मोक्षदा मनोहर यांनी केले.
उद्घाटनपर समारंभानंतर संशोधकांनी लिहिलेल्या शोधनिबंधाचे वाचन करण्यात आले. प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहास यावरती वेगवेगळया विषयांवर शोधनिबंध सादर केले गेले. दिनांक ९ डिसेंबर २०२४ व दि. १० डिसेंबर २०२४ रोजी शोधनिबंध वाचन केले गेले. प्राचीन विभागातील सत्राचे आयोजन डॉ. अंगद पवार, संत गाडगे महाराज लोहा जि. नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली पेपरचे वाचन घेण्यात आले. तर मध्ययुगीन विभाग डॉ. हरि जमाले चिश्तीया कॉलेज, खुल्ताबाद, तर आधुनिक विभाग डॉ. नरेश देशमुख कै. व्यंकटराव देशमुख कॉलेज, बाभळगाव जि. लातूर यांच्या अध्यक्षतेखाली शोधनिबंधाचे वाचन करण्यात आले. या प्रसंगी संशोधकांना अनेक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.
दि १०डिसेंबर २०२४ ला दुपारी ४.०० वाजता ४४ व्या मराठवाडा राष्ट्रीय इतिहास परिषदेचा सांगता समारंभ पार पडला.
समारोपीय समारंभाचे अध्यक्षपद डॉ. नारायण सूर्यवंशी यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी प्रायार्च राजेंद्र मोरे, छ. शिवाजी कॉलेज सातारा सहसचिव, रयत शिक्षण संस्था सातारा, श्री कौस्तुभ आमटे, सहसचिव महारोगी सेवा समिती वरोरा, प्राचार्य डॉ. मृणाल काळे आ. नि. म. वरोरा, डॉ. नितीन बावळे, सचिव मराठवाडा इतिहास परिषद छ. संभाजीनगर, प्रा. डॉ. अरविंद ढोके समन्वयक आ. नि. म. वरोरा यांनी भूषवीले सूत्रसंचालन प्रा. डॉ. पल्लवी ताजणे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा.डॉ. ढोके सर यांनी मानले.
परिषदेसाठी केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, अंदमान व निकोबार इ. ठिकाणाहून म्हणजेच भारताच्या कानाकोपऱ्यातून संशोधक आनंदवनात परिषदेसाठी उपस्थित होते हे ४४ व्या राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषदेचे वैशिष्टय म्हणावे लागेल.