गोंडपिपरी :- सध्या तालुक्याच्या शेतशिवारात मिरची, कापूस, धान आदी पिकांसह भाजीपाल्याचे पीक आहे. यातील धान, कापूस व मिरची नगदी पिके असून कापूस वेचण्याचे काम जोरात सुरू आहे. सोबतच धान व भाजीपाला देखील हातात येण्याच्या तयारीत आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. हातात येणाऱ्या पिकांवर संक्रांत येण्यासह पिकांवर अड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्याचा शेतशिवार पांढऱ्या सोन्याने बहरला आहे. सोबतच मिरची, धान व भाजीपाला पिके निघण्याच्या तयारीत आहे. ही सर्व नगदी पिके असल्याने शेतकऱ्यांचे याच पिकांवर वर्षभराचे बजेट
अवलंबून असते. याच पिकांच्या भरोश्यावर कर्जाची परतफेड, मुलाबाळांचे शिक्षणासह इतर कौटुंबिक कार्यक्रम होत असल्याने शेतकरी या पिकांची काळजी घेत असतो. सध्या कापूस वेचण्यासह धान काढणीचे काम सुरू आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल दिसून येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सोबतच हातात येणाऱ्या कापूस पिकावर संक्रांत येण्याची भीती आहे. हातातोंडी आलेला घास हिरावण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे