गोंडपिपरी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ( विद्या प्राधिकरण ) एन. सी. इ. आर. टी. पुणे, आयआयटी मुंबई आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (आर. एम. एस. ए. ) यांच्या संयुक्त विद्यमाने २०१८ मध्ये गणित अध्यापन दर्जावाढ प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातून ३२३ माध्यमिक गणित शिक्षकांची निवड चाचणीद्वारे यशस्वी शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ४ गणित शिक्षकांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या शिक्षकांना आयआयटी बॉम्बे या अग्रगण्य संस्थेच्या गणित विभागातील प्राध्यापक इंदर के. राणा, प्राध्यापक संतोष घारपुरे व इतर तज्ञ मार्गदर्शका मार्फत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये गणित विषयात साहित्य निर्मिती, अध्यापन पद्धतीत जिओजेब्राचा वापर, शैक्षणिक साहित्य निर्मिती, व्हिडिओ निर्मिती इत्यादींचा समावेश होता. सदर प्रशिक्षण हे सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा येथे तीन टप्प्यात पार फेब्रुवारी २०२० पर्यंत पार पडले. प्रशिक्षणाच्या शेवटी ८० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली व २० गुण व्हिडिओ साठी होते. या परीक्षांमध्ये ३२३ पैकी २४६ प्रशिक्षणार्थी पात्र ठरले. त्या सर्वांना राज्यस्तरीय “तज्ञ मास्टर ट्रेनर” ही पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चार शिक्षकांचा समावेश असून त्या ४ पैकी चंद्रपूर तालुक्याचे धनंजय विनायक जिराफे प्रियदर्शनी कन्या विद्यालय बगड खिडकी, पोंभूर्णा तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय घाटकुळचे रामकृष्ण माधवराव चनकापुरे, कोरपना तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय गडचांदूरचे हरिहर होमराज खरवडे, कोरपना तालुक्यातील क्रिष्णा वासुदेव धोटे जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी या शिक्षकांचा समावेश आहे. या तज्ञांचा ऑनलाईन पदवीदान सोहळा नुकताच पार पडला. त्यात यांना मास्टर ट्रेनर पदवीने सन्मानित करून गौरविण्यात आले.