प्रशासनाचे दुर्लक्ष
अरूण बोरकर / धाबा
गोंडपिपरी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या गोजोली गावातच मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. एकीकडे कोरोना या आजाराने भयभीत असलेल्या नागरिकांवर या चिखलामुळे देखील अनेक छोटे-मोठे आजार उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे.
याच गोजोली गावातून दुबारपेठ, रिठ, चिवंडा या गावांना जोडणारा मार्ग आहे. या अतिदुर्गम गावात वास्तव्यात असलेल्या नागरिकांना अनेक कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्याकरिता याच मार्गाचा अवलंब करावा लागतो आहे. मात्र हा मार्ग सध्या स्थितीत रहदारीच्या हक्काचा नसल्याने अनेक त्रास सहन करीत या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. याच रस्त्यावर गोजोली गावातच मोठमोठे खड्डे पडल्याने या खड्ड्यात पाणी साचले, तर सभोवताल मात्र चिखलाचे साम्राज्य पसरल्याने गावातील नागरिकांना सुद्धा या मार्गाने ये-जा करणे मोठे कठीण झाले आहे. एकीकडे कोरोना संसर्गजन्य महामारी सुरू असताना भयभीत झालेली जनता आता या चिखलाच्या साम्राज्यातून तरी कशी सावरणार हा मोठा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
या मार्गावरून दिवसभर नागरिक ये-जा करीत असल्यामुळे अनेक छोटे मोठे आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण झाल्याने या परिस्थितीबाबत ग्रामपंचायत सचीवाशी संपर्क केला असता सदरील रस्ता हा बांधकाम विभागाकडे मोडत असल्याने त्यांच्याकडे पाठपुरावा करावा अशी माहिती मिळाली. ही परिस्थिती ऐन गावात असल्याने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली असता ग्रामपंचायत सचिवांनी मुरूम टाकण्याचे आश्वासन दिले. मात्र अजून पर्यंत काहीही हालचाल न झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे या संकट काळात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून संबंधित विभाग मात्र याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित विभागावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.