नंदोरी (जि. वर्धा) : वर्धा जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसासोबतच हिंगणघाट तालुक्यातील बोपापूर येथे मासोळ्या पडल्याने गावात अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एका नाही तर तब्बल चार ते पाच घरांवर या मासोळ्या पडल्याने गावकरीही चिंतेत पडले आहेत. या संदर्भात अखिल भारतीय अंधश्रद्धा समितीने हा प्रकार खोडसाळ वृत्तीतून घडल्याचे म्हटले आहे.
गुरुवारी (ता. २७) दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. रात्री पावसाची रिमझिम सुरूच होती. या पावसाबरोबरच बोपापूर येथील चार ते पाच जणांच्या घरी अंगणात, घराच्या छपरावर पावसासोबत मासोळ्या पडल्याचे दिसल्या.
बोपापूर गावातील विकास तिघरे, गजानन दौलतकर, भुजंग खंडाळकर, अविनाश वाघ यामुळे चकित झाले. शुक्रवारी सकाळी हे गृहस्थ घराबाहेर आले असता त्यांना अंगणात, छपरावर मासोळ्या दिसून आल्या सुरुवातीला अविनाश वाघ यांना हा खोडसाळपणा वाटला. मात्र, गावात इतर घरीही हा प्रकार घडल्याचे उघडकीस आल्याने त्यांनाही याचे आश्चर्य वाटले.
अंनिस याचा तपास करेल
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आकाशातून मासोळ्या पडणे कदापि मान्य नाही. हा नक्कीच मानवीकृतीतून केलेला खोडसाळपणा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याचा तपास करेल.
– पंकज वंजारे,
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वर्धा.